spot_img
spot_img
spot_img

आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी वाढणार

शबनम न्यूज | प्रतिनिधी

राज्यातील आदिवासीबहुल क्षेत्रातील विद्यापीठांमध्ये आदिवासी अध्ययन, संशोधन आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी आदिवासी अध्यासन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील विद्यापीठांमध्ये आदिवासी अध्ययन व संशोधनाला या निर्णयांमुळे गती मिळणार असून, त्याचा थेट लाभ आदिवासी विद्यार्थ्यांना होणार आहे. या उपक्रमामुळे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाच्या संधी वाढणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी सांगितले.

मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी अध्यासन केंद्रांना निधी उपलब्ध करण्याबाबत मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, आदिवासी विकास विभागाचे सहसचिव मच्छिंद्र शेळके, मुंबई, जळगाव, नांदेड, अमरावती, गडचिरोली विद्यापीठाचे कुलगुरू उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, जळगाव, नांदेड व मुंबई विद्यापीठात आदिवासी अध्यासन केंद्र कार्यरत असून अमरावती व गडचिरोली विद्यापीठात नव्याने आदिवासी अध्यासन केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. या विद्यापीठाला आदिवासी अध्ययन केंद्रासाठी ३ कोटी रुपयांचा निधी आदिवासी विकास विभागाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या निधीतून केंद्रांची उभारणी, संशोधन उपक्रम आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शैक्षणिक सुविधा विकसित करण्यात येणार आहेत.

आदिवासी समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक विकासासाठी संशोधनाधारित उपक्रमांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. महाराष्ट्रातील आदिवासी जमातींची समृद्ध लोकसंस्कृती, भाषा आणि परंपरा जतन करणे तसेच त्यांच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी संशोधन करणे हा या केंद्रांचा मुख्य उद्देश आहे. यामार्फत आदिवासी समाजाचा इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शैक्षणिक आणि संशोधनात्मक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.

मंत्री डॉ. अशोक वुईके म्हणाले, आदिवासी अध्यासन केंद्राच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या पारंपरिक ज्ञान, संस्कृती आणि जीवनशैलीचा अभ्यास होऊन त्याचे जतन करण्यास मदत होणार आहे. तसेच, शिक्षण आणि संशोधनाच्या माध्यमातून आदिवासी युवकांना नवीन संधी उपलब्ध होऊन त्यांचा सर्वांगीण विकास साध्य होण्यास मदत होईल. आदिवासी विद्यार्थ्यांचा उच्च व तंत्र शिक्षणातील सहभाग वाढविणे आणि त्यांना रोजगारक्षम बनविणे हेही या केंद्रांचे प्रमुख उद्दिष्ट राहणार आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!