पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब
मोशी येथील बोहाडेवाडी परिसरात जुन्या वादातून झालेल्या मारहाणीमध्ये एक जण जखमी झाला असून, या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २७ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ९.३० वाजता बोहाडेवाडी रोडवरील सिल्वर ब्लू हॉटेलसमोर ही घटना घडली. फिर्यादी लक्ष्मण रमेश थोरात (वय ४०, रा. मोशी) हे त्यांच्या मुलगा सोमेश्वर याला झालेल्या मारहाणीबाबत जाब विचारण्यासाठी आरोपींकडे गेले होते.
यावेळी आरोपी तात्या ऊर्फ मच्छिंद्र बोहाडे (वय अंदाजे ४९) व त्याचा साथीदार उपेश (वय अंदाजे २५) यांनी फिर्यादी व त्यांच्या मुलास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच आरोपी बोहाडे याने हातातील लोखंडी कड्याने फिर्यादीच्या डोक्यात वार करून त्यांना जखमी केले.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहेत.




