पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब
नेहरूनगर परिसरात दगडफेक करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या तिघांवर संत तुकारामनगर पोलिसांनी कारवाई करत दोघांना अटक केली असून, एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २८ मार्च २०२६ रोजी रात्री १.१६ वाजण्याच्या सुमारास विठ्ठलनगर, नेहरूनगर येथील बिल्डिंग क्रमांक ३ समोर तीन जण दगडफेक करत असल्याची माहिती डायल ११२ वरून मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली असता संबंधित आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते.
पोलिसांनी पाठलाग करून आरोपी स्वप्नील सतिश जोगदंड (वय १९) व कपिल मिलिंद जोगदंड (वय २३) यांना पकडले. त्यांच्या झडतीत आरोपींकडून एक लोखंडी धारदार कोयता जप्त करण्यात आला. तिघांनी जुन्या वादातून सिद्धार्थ गवळी याला शिवीगाळ करत खाली बोलावून दगडफेक केली, घरांच्या काचा फोडल्या तसेच जीवे मारण्याच्या धमक्या देत परिसरात दहशत निर्माण केल्याचे समोर आले.
या प्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम १२५, ३५२, ३५१ तसेच भारतीय शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार पवार करीत आहेत.




