spot_img
spot_img
spot_img

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : MSME व पायाभूत सुविधांना चालना, अंमलबजावणी निर्णायक ठरणार

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ हा सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME), कौशल्य विकास, निर्यात आणि पायाभूत सुविधांवर केंद्रित असलेला संतुलित अर्थसंकल्प असल्याचे मत पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष श्री. संदीप श्रीपाद बेलसरे यांनी व्यक्त केले. मात्र प्राप्तीकर तसेच नविन वाहन खरेदीसाठी कोणतीही करसवलत न दिल्याने मध्यमवर्ग व उद्योग क्षेत्रात काहीशी नाराजी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

अर्थसंकल्पात २०० औद्योगिक क्लस्टरचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सादर केलेली योजना स्वागतार्ह असून यामुळे उद्योगांची खर्च स्पर्धात्मकता व उत्पादन कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल. “चँपियन सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग” तयार करण्यासाठीची योजना स्थानिक उद्योगांना जागतिक स्तरावर सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

₹१०,००० कोटींच्या MSME ग्रोथ फंडची घोषणा तसेच आत्मनिर्भर भारत फंडमध्ये ₹२,००० कोटींचे अतिरिक्त योगदान यामुळे सूक्ष्म उद्योगांना भांडवली आधार मिळून त्यांची वाढ व विस्तार सुलभ होईल, असा विश्वास बेलसरे यांनी व्यक्त केला.

व्यापार देयक सवलत प्रणाली (TReDS) प्रभावी करून उद्योगांची देयके ४५ दिवसांत मिळण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे. मात्र या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी सर्व उद्योगांनी नोंदणी करणे आवश्यक असल्याने शासनाने यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबवावी, अशी मागणी त्यांनी केली.

पातळी–२ व पातळी–३ शहरांमध्ये ‘कॉर्पोरेट मित्र’ गट विकसित करण्याचा निर्णय लहान शहरांतील उद्योगांसाठी उपयुक्त ठरेल. तसेच युवकांच्या कौशल्य विकासावर दिलेला भर उद्योगांना कौशल्यसंपन्न मनुष्यबळ उपलब्ध करून देणारा आहे.

डिझाईन क्षेत्रासाठी नवीन राष्ट्रीय डिझाईन संस्था आणि सेमीकंडक्टर उद्योगासाठी ₹४०,००० कोटींची तरतूद केल्यामुळे भारतीय वाहन व इलेक्ट्रॉनिक्स उद्योग आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. मुंबई–पुणे व पुणे–हैदराबाद उच्चगती रेल्वे मार्गांच्या घोषणेमुळे औद्योगिक दळणवळण व गुंतवणुकीला चालना मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

मात्र या व मागील अर्थसंकल्पात MSME साठी जाहीर केलेल्या सर्व योजनांची प्रभावी आणि वेळेत अंमलबजावणी झाली तरच हा अर्थसंकल्प यशस्वी ठरेल, अशी भूमिका पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेने व्यक्त केली आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!