spot_img
spot_img
spot_img

सुनियोजित आणि विकसीत शहरासाठी पुढील ५० वर्षाचे नियोजन व्हावे- मुख्यमंत्री

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड हे वाढते शहर असून त्याचा विकास सुनियोजितरित्या होण्यासाठी शहराचा उत्तम आराखडा करा आणि पुढच्या पिढीचा विचार करून आगामी ५० वर्षाचे नियोजन व्हावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. शहराचे नियोजन करत असतांना जनतेला विश्वासात घेणे गरजेचे असून त्यादृष्टीने लोकप्रतिनिधी आणि जनतेच्या मागणीनुसार चऱ्होलीची नगर रचना योजना रद्द करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने पुणे-आळंदी पालखी मार्गावर वडमुखवाडी येथे उभारण्यात आलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज भेटीचे समुहशिल्प व संतसृष्टीचे लोकार्पण, संतपीठ येथील प्रेक्षागृह व कलादालन लोकार्पण यासह विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, श्रीकांत भारतीय, महेश लांडगे, शंकर जगताप, माजी आमदार अश्विनी जगताप, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, जिल्हाधिकारी संत साहित्याचे अभ्यासक ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे आदी उपस्थित होते.

संत ज्ञानेश्वर माऊलींनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढविला, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, ज्ञानेश्वर माऊलींनी सोप्या शब्दात भागवत धर्माचे तत्वज्ञान आणि आपला वैश्विक विचार आपल्यापर्यंत पोहोचविला. त्यामुळेच माऊलीच्या पालखीत लाखो वारकरी सहभागी होतात. संत नामदेव महाराजांनी ही परंपरा आपल्यापर्यंत अभंगाच्या माध्यमातून पोहोचविताना भागवत धर्मातील हा विचार पंजाबपर्यंत पोहोचविला. शिखांचा धर्मग्रंथ ‘गुरु ग्रंथसाहिब’मध्ये संत नामदेव महाराजांचे विचार समाविष्ट आहेत. ज्यांनी भागवत धर्माला उंची दिली अशा दोन संतश्रेष्ठाच्या भेटीचे शिल्प महानगरपालिकेने उभारले आहे. वारकरी संप्रदायात प्रत्येक जण एकमेकांना माऊली समजतो, ईश्वराचे रूप समजतो, हाच भाव या शिल्पात आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

आपला वैश्विक विचार जगाला साद घालणारा
जगाला साद घालणारा आणि दिशा देणारा असा आपला वैश्विक विचार आहे. एका पिढीने दुसऱ्याला दिल्याने तो टिकून आहे. जोपर्यंत वारी आहे तोपर्यंत विचार आहे, आणि सूर्य-चंद्र असेपर्यंत वारी आहे. या विचाराच्या प्रसारासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सुंदर संतपीठ तयार केले. सीबीएसई अभ्यासक्रमासोबत हा विचार पोहोचविण्याचे कार्य संतपीठाच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे संतपिठाच्या विस्तारासाठी आराखडे, नियोजन केल्यास त्याच्यापाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे राहील.

नदीमध्ये जाणाऱ्या १०० टक्के पाण्यावर प्रक्रियेसाठी प्रयत्नशील
इंद्रायणी नदी निर्मळ करण्यासाठी नदीमध्ये जाणारे १०० टक्के पाणी प्रक्रिया केलेले असेल यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. या माध्यमातून इंद्रायणीचे पावित्र्य जपण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी अमृत योजनेंतर्गत दोन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू होत आहे. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे, असे श्री.फडणवीस म्हणाले. महापालिकेचे विकास प्रकल्प नागरिकांसाठी उपयुक्त असून खेळाडू तयार करणारी पिढी घडावी यासाठी महापालिकेने उभारलेली क्लायबिंग वॉल उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

माणुसकी या धर्मानुसार पोलीसांचे काम
पोलीस आयुक्तालयाने दोन चांगल्या प्रणाली सुरू केल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांना उतारवयात आधाराची गरज असते, कोणीतरी पाठीशी उभे आहे असे त्यांना वाटायला हवे. अनेकदा ज्येष्ठांना आपत्कालीन परिस्थितीत मदतीची आवश्यकता असते. माणुसकी हा खरा धर्म म्हणून पोलीस काम करतात. त्यादृष्टीने पोलीस आयुक्तालयाने तयार केलेले ‘ज्येष्ठानुबंध’ हे ॲप ज्येष्ठ नागरिकांना उपयुक्त ठरेल. पुणे, पिंपरी चिंचवड आदी ठिकाणी वाहतुकीच्या नियमनासाठी ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ सुरू करण्यात येत असून त्यात एआयचा समावेश असलेल्या प्रणाली आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पोलीस दल सज्ज होत असून नागरिकांसाठी चांगली यंत्रणा उभी रहात आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आमदार लांडगे म्हणाले, राज्य शासनाने सहकार्य केल्याने पिंपरी चिंचवड परिसरात पोलीस आयुक्तालयाची आणि महानगरपालिकेची विकासकामे वेगाने होत आहेत. मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी या परिसराच्या विकासाला विशेष गती दिल्याचे त्यांनी सांगितले.

पोलीस आयुक्त श्री. चौबे म्हणाले, पोलीस आयुक्त श्री. चौबे म्हणाले, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘ज्येष्ठानुबंध’ हे ॲप विकसित करण्यात आले आहे. या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना पोलिसांशी संपर्क साधता येईल. २२ हजार नागरिकांनी आतापर्यंत हे ॲप डाउनलोड केले असून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उपयोगामुळे ज्येष्ठ नागरिकांना हे ॲप उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘ट्रॅफिक बडी’ व्हाट्सअप प्रणालीच्या माध्यमातून वाहतूक नियमनात नागरिकांचे सहकार्य होईल. आतापर्यंत ३०० नागरिकांनी ‘ट्रॅफिक बडी’ म्हणून नोंदणी केली आहे. पोलिसांविषयी आदर आणि विश्वास निर्माण करणाऱ्या या दोन प्रणाली असल्याचे त्यांनी सांगितले.

महानगरपालिका आयुक्त श्री. सिंह यांनी प्रास्ताविकात माहिती दिली, मुखमंत्री महोदयांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण, उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात येत आहे. पिंपळे सौदागर येथे गिर्यारोहणासाठी क्लायबिंग वॉल उभारण्यात आली असून हा प्रकल्प देशातील उत्तम केंद्रापैकी एक असेल. विविध विकास प्रकल्पाच्या माध्यमातून नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने विविध प्रकल्पांचे लोकार्पण, उद्घाटन व भूमिपूजन करण्यात आले. तसेच या प्रकल्पांविषयी चित्रफीत दाखविण्यात आली.

विविध प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण व भूमिपूजन
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रभाग क्र. १६ मध्ये मुकाई चौक कृष्णा हॉटेल ते लोढा स्किमपर्यंत एक्सप्रेस हायवे लगतचा १२ मीटर डी.पी. सर्विस रस्ता विकसित करणे (भाग १ व भाग २), बापदेव मंदिर येथील किवळे गावातील मुख्य रस्ता ते एक्सप्रेस हायवेपर्यंतचा सिंबायोसिस कॉलेजमागील १८ मीटर डी.पी. रस्ता विकसित करणे, प्रभाग क्र. १६ विकासनगर येथील मुख्य रस्ता डांबरीकरण करून विकसित करणे, गवळी माथा ते इंद्रायणीनगर चौक पर्यंतचा रस्ता अर्बन स्ट्रीट स्केपिंग पद्धतीने विकसित करण्याच्या कामाचा भुमिपूजन तसेच पिंपरी चिंचवड शहरातील दिव्यांग नागरिकांच्या घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून त्यांचे सामाजिक व आर्थिक जीवनचक्राचे मॅपिंग करण्याच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने संत मदर टेरेसा उड्डाणपूलावरून चिंचवड बाजूकडे उतरण्यास व चढण्यास बांधण्यात आलेल्या लूप, रॅम्प, पवना नदीवर थेरगाव प्र. क्र. ५० मध्ये प्रसुनधाम शेजारी १८ मीटर डी.पी. रस्त्यावरील उभारण्यात आलेल्या थेरगाव-चिंचवड पूल, अमृत योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या चिखली (१२ एमएलडी) व पिंपळे निलख (१५ एमएलडी) क्षमतेच्या मैलाशुद्धीकरण प्रकल्प, पिंपळे सौदागर येथे गिर्यारोहणासाठी उभारण्यात आलेल्या क्लायबिंग वॉल, प्रभाग क्र. ४ दिघी येथे आरक्षण क्र. २/१२२ येथे बांधलेल्या शाळा इमारत, प्रभाग क्र. ३ चऱ्होली येथील चोविसावाडी येथील अग्निशमन केंद्र इमारत, भोसरी येथील प्रभाग क्र. ७, आरक्षण क्र. ४३० येथील प्राथमिक शाळा इमारत, थेरगाव व भोसरी रुग्णालयाचे मध्यवर्ती निर्जंतुकीकरण विभाग, प्रभागाचे लोकार्पण करण्यासह क्र. ५ मधील सखुबाई गबाजी गवळी उद्यान येथील बहुमजली वाहनतळ इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!