कृष्णकुमार गोयल यांचे प्रतिपादन
२०० विद्यार्थ्यांना गणवेश, शूज, बॅगचे मोफत वाटप
पुणे : ‘विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा देणे हे कोणत्याही संस्थेचे प्राथमिक कर्तव्य आहे. शिक्षणसंस्था चालवताना या सर्व गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्यावे लागते. मात्र, सर्वच गोष्टी संस्था करू शकत नाही. त्यासाठी समाजातील अनेक घटकांचा हातभार लागतो. हा हातभार ज्या संस्थेला लाभतो, ती संस्था लवकर प्रगती करते,’ असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक व खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी केले.
खडकी शिक्षण संस्थेचे आलेगावकर प्राथमिक विद्यालय व पीपीएम बालशिक्षण मंदिरातील २०० विद्यार्थ्यांना गुरुवारी गणवेश, शूज आणि बॅगचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी संस्थेचे सचिव आनंद छाजेड, एमक्युअर संस्थेचे संचालक नकुल माटेकर, गिरीश घनवट आदी उपस्थित होते. संचालक राजेंद्र भुतडा यांनी स्कूल बॅग, सुधीर फेंगसे यांनी शूज, तर मीना बुरूड, विलास मुथा, जयश्री माकर, रियाज अमलानी यांनी या उपक्रमासाठी आर्थिक साह्य केले. तब्बल २०० विद्यार्थी-विद्यार्थिनींना या शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
गोयल म्हणाले, ‘या भागातील मुले आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत. त्यांना शालोपयोगी वस्तूंची गरज असते. ही गरज समाजातील विविध घटकांमार्फत पूर्ण होते. त्यासाठी आमचे संचालक आणि शिक्षकही पुढाकार घेतात. असे शिक्षक आणि संचालकच संस्थेचे खरे आधारस्तंभ असतात.’
नकुल माटेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापिका चंद्रकांता सोनकांबळे यांनी प्रास्ताविक केले, संचालिका शुभांगी बरेल्लू यांनी परिचय करून दिला, सहशिक्षक प्रल्हाद झरांडे यांनी सूत्रसंचालन केले, तर सचिव आनंद छाजेड यांनी आभार मानले.



