शबनम न्यूज | प्रतिनिधी
मागील दोन दिवसांपासून शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे तसेच जोरदार वाऱ्यामुळे पिंपरी चिंचवडमधील विविध भागांत झाडपडीच्या घटना घडल्या. या घटनांची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत झाडे व तुटलेल्या फांद्या हटवून परिसर सुरक्षित करण्याची कार्यवाही केली.
दोन दिवसात शहरातील सेक्टर २४, निगडी प्राधिकरण, फिनोलेक्स कंपनी परिसर, पिंपरी, ओम साई हौसिंग सोसायटी, आकुर्डी तसेच काजळे पेट्रोल पंप शेजारी, पुणे-नाशिक महामार्ग येथे झाडपडीच्या घटना घडल्या. अग्निशमन विभागाच्या पथकांनी त्वरित प्रतिसाद देत झाडे हटवली, वाहतुकीतील अडथळे दूर केले आणि परिसर नागरिकांसाठी सुरक्षित केला.
पावसाळ्यात जोरदार वारे आणि सततच्या पावसामुळे झाडे उन्मळून पडण्याच्या किंवा मोठ्या फांद्या तुटण्याच्या घटना घडू शकतात. त्यामुळे नागरिकांनी अशा परिस्थितीत संयम राखून आवश्यक ती खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे अग्निशमन विभागाने म्हटले आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन विभागाची सर्व पथके २४ तास सज्ज असून, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी त्वरित १०१ या क्रमांकावर संपर्क साधावा, तसेच झाड कोसळलेल्या ठिकाणी अनावश्यक गर्दी करू नये, तुटलेल्या फांद्या तसेच विद्युत तारा किंवा वायरपासून सुरक्षित अंतर ठेवावे आणि स्वतः झाड किंवा फांद्या हटवण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने केले आहे.



