शबनम न्यूज | प्रतिनिधी
जीवन आधार ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक सभा गुरुवार (दि. ३० जुलै) रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लघुउद्योजक सुरेश तुळे होते.
सभेची सुरुवात अंजली मोरे, जया अमीन आणि मालती कवडे यांनी सादर केलेल्या सुरेल प्रार्थनेने झाली. त्यानंतर उपस्थित ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध महत्त्वपूर्ण विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर पोमण यांनी वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांनी आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत सविस्तर माहिती दिली. तर पोलिस आयुक्तालयाच्या ज्येष्ठ नागरिक कक्षाचे राजाराम शेळके यांनी घरगुती त्रास किंवा अन्य अडचणींच्या वेळी ज्येष्ठ नागरिकांनी मदत कक्षाशी संपर्क साधावा, प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, असे आश्वासन दिले.
यावेळी मेडिक्लेम इन्शुरन्सचे अधिकारी विनीत राऊत यांनी मेडिक्लेम विम्याचे फायदे आणि त्याद्वारे ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक बचत कशी होऊ शकते, याविषयी मार्गदर्शन केले. तसेच साई हॉस्पिटलचे डॉ. प्रशांत देशमुख यांनी वाढत्या वयात आरोग्याची योग्य काळजी, नियमित तपासणी आणि संतुलित जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित केले.
सभेदरम्यान जुलै महिन्यात जन्मदिन असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस साजरा करून त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच आयोजित करण्यात आलेल्या लकी ड्रॉमध्ये शांती नाईक या भाग्यवान विजेत्या ठरल्या. त्यांचाही विशेष भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन जीवन आधार ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक विशाल बाळासाहेब काळभोर यांनी केले. सभेची प्रस्तावना संघाचे अध्यक्ष खंडेराव काळे यांनी केली, तर संयोजन व सूत्रसंचालन प्रकाश परदेशी यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रवींद्र मांजरेकर, एकनाथ कालेकर, विजय सुर्वे, इब्राहिम शेख, सचिन मोकाशी, अस्लम शेख, दीपक गायकवाड आणि सुजाता पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
जीवन आधार ज्येष्ठ नागरिक संघाच्या या मासिक सभेमुळे ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षा, आरोग्य, विमा आणि कायदेशीर मदतीसंबंधी उपयुक्त माहिती मिळाल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.



