पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
सायबर फसवणुकीतील आर्थिक व्यवहारांसाठी स्वतःचे बँक खाते उपलब्ध करून देत फसवणूक करणाऱ्या टोळीला मदत केल्याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी एका १९ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पियूष उमेश जामदार (वय १९, रा. तळवडे, पुणे) याने स्वतःच्या बँक ऑफ महाराष्ट्र येथील खात्याचा वापर सायबर गुन्हेगारांच्या आर्थिक व्यवहारांसाठी होऊ दिला. तपासात संबंधित खात्यात ₹१,२२,१०६ इतकी सायबर फसवणुकीची रक्कम जमा झाल्याचे निष्पन्न झाले असून, त्यापैकी ₹६० हजार एटीएमद्वारे काढण्यात आल्याचेही समोर आले आहे.
याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ११२(२), ६१(२), ३१८(४), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्या कलम ६६(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.


