पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
भरधाव वेगातील टेम्पोने राँग साईडने येत बलेनो कार व रिक्षाला जोरदार धडक दिल्याने तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना निघोजे (ता. खेड) येथे घडली. अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून फरार झाला असून त्याच्याविरुद्ध दक्षिण महाळुंगे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 जुलै रोजी दुपारी स्पायसर चौक ते डोगरवस्ती मार्गावरील पाझर तलावाजवळ एमएच-12 ईएफ-6566 क्रमांकाच्या टेम्पो चालकाने भरधाव व निष्काळजीपणे राँग साईडने वाहन चालवत एमएच-14 एमएल-4446 क्रमांकाच्या बलेनो कार आणि एमएच-14 एलएस-8145 क्रमांकाच्या रिक्षाला धडक दिली. या अपघातात अनिकेत येळवंडे व शरवरी येळवंडे हे गंभीर जखमी झाले, तर फिर्यादी दर्शन येळवंडे आणि रिक्षाचालक सुनील महामुणकर यांना किरकोळ दुखापत झाली. अपघातात दोन्ही वाहनांचेही मोठे नुकसान झाले.
या प्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलिसांनी अज्ञात टेम्पो चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता व मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून फरार चालकाचा शोध सुरू आहे.



