शबनम न्यूज | प्रतिनिधी
पवना धरण शंभर टक्के भरले असून पावसाळाही अद्याप सुरू असल्याने पिंपरी-चिंचवड शहरात दररोज, मुबलक आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी महापौरांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नगरसेविका तरस यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पवना धरण पूर्ण क्षमतेने भरले असताना शहरातील नागरिकांना एकाआड एक दिवस पाणीपुरवठा करण्याची आवश्यकता उरलेली नाही. अनेक भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयींचा सामना करावा लागत असून, विशेषतः उंच भाग आणि शेवटच्या टोकावरील परिसरात पाणी व्यवस्थित पोहोचत नसल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली आहे.
यासंदर्भात त्यांनी महापालिका प्रशासनाकडे चार प्रमुख मागण्या केल्या आहेत. पावसाळा संपेपर्यंत संपूर्ण शहरात दररोज पाणीपुरवठा करावा, सर्व भागात मुबलक व पुरेशा दाबाने पाणी द्यावे, नागरिकांना पुरेसा वेळ पाणी उपलब्ध होईल याची दक्षता घ्यावी तसेच कमी दाबाने पाणी मिळणाऱ्या भागांमध्ये तातडीने तांत्रिक उपाययोजना करून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
“पाणी हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. धरण पूर्ण भरलेले असताना शहरवासीयांना पुरेशा प्रमाणात आणि नियमित पाणीपुरवठा मिळणे आवश्यक आहे,” असेही नगरसेविका ऐश्वर्या तरस यांनी निवेदनात नमूद केले आहे.
या मागणीवर महापालिका प्रशासन काय निर्णय घेते, याकडे आता शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.



