शबनम न्यूज | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उमेश पाटील यांनी गुरुवारी करवीर पीठाचे शंकराचार्य यांची भेट घेऊन कुटुंबातील आई किंवा वडिलांच्या निधनानंतर विवाहासंदर्भात प्रचलित धार्मिक परंपरा आणि समजुतींबाबत मार्गदर्शन घेतल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी खासदार पार्थ अजित पवार यांच्या विवाहाची तारीख आणि स्थळाचीही घोषणा केली.

उमेश पाटील म्हणाले की, समाजात आई किंवा वडिलांच्या निधनानंतर विवाह एका वर्षाच्या आत करावा, अन्यथा पुढील तीन वर्षे विवाह करता येत नाही, अशी समजूत प्रचलित आहे. या पार्श्वभूमीवर वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी करवीर पीठाच्या शंकराचार्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.
त्यांनी सांगितले की, करवीर शंकराचार्य पीठाचे छत्रपती शाहू महाराजांशी ऐतिहासिक संबंध असल्याने या विषयावरील धार्मिक परंपरा आणि मान्यतांबाबत त्यांचे मार्गदर्शन घेण्यात आले.

उमेश पाटील यांच्या माहितीनुसार, शंकराचार्यांनी स्पष्ट केले की, आई किंवा वडिलांच्या निधनानंतर धर्मशास्त्रानुसार आवश्यक सर्व धार्मिक विधी आणि संस्कार पूर्ण करणे अपेक्षित आहे. मात्र विवाह एका वर्षाच्या आतच करणे बंधनकारक असल्याचा कोणताही धार्मिक नियम किंवा अनिवार्यता नाही. त्यामुळे या विषयावर कोणताही गैरसमज बाळगण्याचे कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी उमेश पाटील यांनी खासदार पार्थ अजित पवार यांचा विवाह २७ फेब्रुवारी २०२७ रोजी बारामती येथे होणार असल्याची माहिती दिली. तसेच २९ जुलै २०२६ रोजी त्यांचा साखरपुडा अत्यंत साध्या आणि कौटुंबिक वातावरणात पार पडणार असून, त्यामध्ये केवळ निकटवर्तीय आणि निमंत्रित उपस्थित राहतील, असेही त्यांनी सांगितले.4

पार्थ पवार यांची होणारी पत्नी कायनात धार या मूळच्या चंदीगड येथील असून सध्या दिल्ली येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या नावाबाबत आणि जन्मस्थळाबाबत काही माध्यमांत चुकीची व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित झाल्याने वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी ही अधिकृत माहिती देण्यात आल्याचे उमेश पाटील यांनी सांगितले.


