शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील वेस्ट टू एनर्जी (कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती) प्रकल्पात झालेल्या भीषण दुर्घटनेप्रकरणी अखेर ठेकेदार कंपनीच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कचऱ्याचा डोंगर कोसळून झालेल्या या दुर्घटनेत नऊ निष्पाप कामगारांचा मृत्यू झाला होता, तर १२ कामगार गंभीर जखमी झाले होते.
एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात अँटोनी लारा रेन्यूएबल कंपनीचे प्रकल्प प्रमुख अशोककुमार सियाराम शरण गुप्ता (वय ५९) आणि सुरक्षा अधिकारी विजय रामराव सपकाळ (वय ३८) यांच्याविरोधात सदोष मनुष्यवध व निष्काळजीपणामुळे गंभीर दुखापत या कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हे दोन्ही अधिकारीही या दुर्घटनेत जखमी झाले होते.
महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता सोहन मधुकर निकम यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पावसाळ्यात कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यांची माहिती असूनही आवश्यक खबरदारी घेण्यात आली नाही, असा ठपका ठेकेदार कंपनीवर ठेवण्यात आला आहे.
प्राथमिक चौकशीत धक्कादायक बाब समोर आली आहे. दुर्घटनेपूर्वीच डेपोतील कचऱ्याचे ढिगारे इमारतीलगत खचत असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापनाला दिली होती. संभाव्य धोका स्पष्टपणे निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे चौकशीत उघड झाले आहे.
दुर्घटनाग्रस्त इमारतीचे दोन्ही वरचे मजले अनधिकृत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या प्रकरणात केवळ निष्काळजीपणाच नव्हे, तर बांधकाम नियमांचे उल्लंघन झाले का, याचाही तपास केला जाणार आहे.


