पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
पॉलिसीची रक्कम परत मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका अनोळखी सायबर भामट्याने चिखलीतील नागरिकाची तब्बल ८ लाख ७१ हजार २३५ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अच्युत ज्ञानदेव ससाणे (वय ४५, रा. रुपीनगर, चिखली) यांना एका अनोळखी व्यक्तीने मोबाईलवर संपर्क साधला. स्वतःला “आयजीएमएस कस्टमर सर्व्हिस”चा प्रतिनिधी असल्याचे सांगत त्याने पॉलिसीची कागदपत्रे मागविली. तसेच पॉलिसीचे अडकलेले पैसे परत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
विश्वास संपादन केल्यानंतर विविध कारणे सांगून फिर्यादींकडून वेळोवेळी पैसे भरून घेतले. मात्र पैसे परत न करता आरोपीने त्यांची ८.७१ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली.
हा प्रकार १ फेब्रुवारी २०२५ ते १० मार्च २०२६ या कालावधीत घडला. फसवणुकीची खात्री झाल्यानंतर फिर्यादींनी चिखली पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील फसवणूक तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक फडतरे करीत आहेत.
सायबर गुन्हेगारांच्या अशा आमिषांना बळी पडू नये, कोणतीही पॉलिसी किंवा आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी संबंधित कंपनीची खातरजमा करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


