spot_img
spot_img
spot_img

इन्स्टाग्रामवरील बेटिंगच्या आमिषाला बळी; मोशीतील व्यावसायिकाची तब्बल ३०.८३ लाखांची फसवणूक

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

इन्स्टाग्रामवरील ऑनलाईन गेमिंग आणि बेटिंगच्या जाहिरातीला बळी पडलेल्या मोशीतील एका व्यावसायिकाची तब्बल ३० लाख ८३ हजार ८२१ रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत सुरेश सपकाळ (वय ३३, रा. केंद्रीय विहार, मोशी प्राधिकरण) यांना त्यांच्या इन्स्टाग्रामवरील “pankasapkan” या आयडीवर “Four rabet” नावाच्या आयडीवरून ऑनलाईन गेमिंग व बेटिंगसंदर्भातील जाहिरात प्राप्त झाली होती. आरोपीने पैसे गुंतवल्यास रक्कम दुप्पट करून परत देण्याचे आमिष दाखवत फिर्यादीचा विश्वास संपादन केला.

यानंतर आरोपीने विविध बँक खात्यांचे क्यूआर कोड आणि स्कॅनर पाठवून टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादीने त्यांच्या कोटक महिंद्रा बँक खात्यातून वेळोवेळी एकूण ३०.८३ लाख रुपये आरोपीकडे पाठविले. मात्र, कोणताही परतावा न देता आरोपीने संपर्क टाळला.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सपकाळ यांनी एमआयडीसी भोसरी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या फसवणुकीच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला असून संबंधित इन्स्टाग्राम आयडी आणि आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू केला आहे.

सायबर पोलिसांचे आवाहन

सोशल मीडियावरील “पैसे दुप्पट”, “झटपट नफा”, “ऑनलाईन बेटिंग” अशा जाहिरातींवर विश्वास ठेवू नये. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित प्लॅटफॉर्मची खातरजमा करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खोसे करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!