मुंबई : बँकेच्या शाखेत जाऊन चेक जमा करणे, डिमांड ड्राफ्ट काढणे, रोख रक्कम जमा किंवा काढणे तसेच इतर महत्त्वाची कागदपत्रांची कामे करायची असतील, तर ती २५ जूनपूर्वी पूर्ण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या आठवड्याच्या शेवटी काही राज्यांमध्ये बँका सलग तीन दिवस बंद राहण्याची शक्यता आहे.
देशभरातील सार्वजनिक आणि खासगी बँका २२ ते २५ जूनदरम्यान नियमितपणे सुरू राहतील. मात्र, आरबीआयच्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार २६ जून रोजी मोहरमनिमित्त अनेक राज्यांमध्ये बँकांना सुट्टी असेल. ही सुट्टी सर्व राज्यांमध्ये लागू नसल्याने ग्राहकांनी आपल्या शहरातील सुट्टीची माहिती तपासून घ्यावी.
यानंतर २७ जून रोजी महिन्याचा चौथा शनिवार असल्याने देशभरातील सर्व बँका बंद राहतील. २८ जून रोजी रविवारची साप्ताहिक सुट्टी असल्यामुळे काही राज्यांमध्ये बँकांच्या शाखा सलग तीन दिवस बंद राहू शकतात.
दरम्यान, जुलै महिन्यात विविध स्थानिक सणांमुळे काही शहरांमध्ये बँकांना अतिरिक्त सुट्ट्या असतील. आयझॉलमध्ये एमएचआयपी दिन, शिलाँगमध्ये स्थानिक उत्सव, तर भुवनेश्वर, डेहराडून आणि इम्फाळ येथे रथयात्रा, कांग आणि हरेला या सणांमुळे बँका बंद राहणार आहेत. आगरतळामध्ये खर्ची पूजेनिमित्तही बँकांना सुट्टी असेल.
बँकांच्या शाखा बंद असल्या तरी ग्राहकांसाठी नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, यूपीआय आणि एटीएम सेवा नियमितपणे उपलब्ध राहतील. गूगल पे, फोनपे, पेटीएम यांसारख्या डिजिटल माध्यमांतून व्यवहार करता येणार असून एटीएममधून रोख रक्कम काढणे व जमा करणेही सुरू राहणार आहे.


