पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
चिंचवड परिसरात गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने अंमली पदार्थ बाळगणाऱ्या दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांवर पोलिसांनी कारवाई करत ५१६ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्हेकरवाडी गावठाण परिसरात इलेक्ट्रिक डीपीजवळ संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यांच्या ताब्यातून २७ हजार रुपये किमतीचा ५१६ ग्रॅम गांजा आढळून आला.
चौकशीदरम्यान एका बालकाने हा गांजा दुसऱ्या बालकाकडून विक्रीसाठी आणल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार दोघांविरुद्ध एनडीपीएस कायदा कलम ८(क), २०(ब) आणि २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे चिंचवड परिसरातील अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीच्या साखळीचा तपास करण्यासाठी पोलिसांनी पुढील चौकशी सुरू केली आहे. बालकांचा वापर करून अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या टोळ्यांचा शोध घेण्यावरही पोलिसांचा भर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


