spot_img
spot_img
spot_img

मंदिरातील दानपेटी फोडणारे आणि देवीचा चांदीचा मुकुट चोरणारे दोन सराईत चोर जेरबंद

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत धडाकेबाज कारवाई करत इंदुरी येथील ग्रामदैवत कडजाई माता मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम चोरणाऱ्या तसेच तळेगाव दाभाडे येथील तुळजाभवानी माता मंदिरातील देवीचा चांदीचा मुकुट लंपास करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे १ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या कारवाईमुळे तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत मालमत्तेविरोधातील गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी अशा गुन्ह्यांचा समांतर तपास करून आरोपींना जेरबंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सहायक पोलीस आयुक्त सचिन कदम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव एमआयडीसी पोलिसांचे तपास पथक सक्रिय झाले.

दि. १२ जून २०२६ रोजी मध्यरात्री इंदुरी येथील ग्रामदैवत कडजाई माता मंदिरातील दानपेटी फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम चोरून नेली होती. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण केले. तसेच गोपनीय बातमीदारांचे जाळे सक्रिय करून आरोपींचा माग काढला.

तपासादरम्यान आरोपी चाकण परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दोन स्वतंत्र पथके तयार करून शोधमोहीम राबवली. या कारवाईत कुणाल बाळू वीर (वय २३, रा. सुंबरेनगर, चाकण) आणि लोबो उर्फ सुर्या श्रीमंतहो दास (वय २६, रा. कडाचीवाडी, चाकण) यांना ताब्यात घेण्यात आले. सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केल्यानंतर हेच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.

सखोल चौकशीत आरोपींनी तळेगाव दाभाडे आणि म्हाळुंगे परिसरातही अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून मेमोरँडम पंचनाम्याद्वारे १ किलो २५० ग्रॅम वजनाचा देवीचा चांदीचा मुकुट आणि रोख रक्कम जप्त केली. एकूण सुमारे १.४९ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

उघडकीस आलेले गुन्हे

– तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन गु.र.नं. १६९/२०२६
– तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन गु.र.नं. २०२/२०२६
– दक्षिण म्हाळुंगे पोलीस स्टेशन गु.र.नं. ५१५/२०२६

पोलिसांनी आरोपींना अटक केली असून त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. मंदिरांमध्ये चोरी करणाऱ्या टोळीचा आणखी पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस उपआयुक्त श्वेता खेडकर, सहायक पोलीस आयुक्त सचिन कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक खरात तसेच तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!