spot_img
spot_img
spot_img

अंकुश चौकातील वाहतूक सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करा; मनसेची महापालिकेकडे मागणी

पिंपरी, प्रतिनिधी – युनूस खतीब

निगडी परिसरातील अंकुश चौक येथे वाढत्या वाहतुकीमुळे निर्माण होणारी कोंडी आणि अपघातांचा संभाव्य धोका लक्षात घेता वाहतूक सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निगडी विभाग शाखाध्यक्ष कु. सागर बहुले यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडे केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात बहुले यांनी नमूद केले आहे की, गेल्या अनेक महिन्यांपासून अंकुश चौकातील वाहतुकीच्या विविध समस्यांबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात आला असून त्यातून सिग्नलसंदर्भातील आवश्यक कामे पूर्ण करण्यात आली आहेत. मात्र, चौकातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित आणि सुरळीत करण्यासाठी अद्याप काही महत्त्वाच्या सुविधा उभारणे आवश्यक आहे.

निवेदनानुसार, चौकात झेब्रा क्रॉसिंग, स्टॉप लाईन, डिव्हायडर सेफ्टी पट्टे, रोड मार्किंग तसेच आवश्यक ठिकाणी नो पार्किंग फलक बसविण्यात यावेत. यामुळे बेकायदेशीर वाहतुकीस आळा बसून वाहनचालक आणि पादचाऱ्यांची सुरक्षितता वाढण्यास मदत होणार आहे.

तसेच अंकुश चौकालगतच्या सर्व्हिस रोडवर अनधिकृतपणे पार्किंग करण्यात आलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला आहे. या वाहनांवर नियमित कारवाई करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.

वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर चौकाच्या मध्यभागी योग्य नियोजन करून डिव्हायडर उभारण्यात यावा, तसेच वाहनचालकांना योग्य दिशा मिळावी यासाठी दिशादर्शक फलक बसविण्यात यावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय, चौकात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना ऊन, वारा आणि पावसापासून संरक्षण मिळावे यासाठी स्वतंत्र केबिन उभारण्याची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

अंकुश चौक परिसरातील नागरिकांनीही सर्व्हिस रोडवरील अनधिकृत पार्किंगवर कारवाई करण्याची मागणी केली असून, त्यामुळे वाहतुकीसाठी रस्ता पूर्णपणे मोकळा होऊन अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

महापालिका प्रशासनाने या सर्व मागण्यांचा गांभीर्याने विचार करून तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नागरिक आणि मनसे पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!