पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
चाकण परिसरात घरगुती गॅस सिलेंडरची काळाबाजारासाठी अवैध वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीवर उत्तर चाकण पोलिसांनी कारवाई करत १ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी विवेक लालमन गुप्ता (वय ४५, रा. आगकरवाडी, चाकण) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण ते आगकरवाडी मार्गावरील सिद्धार्थ बौद्ध विहारासमोर सापळा रचून कारवाई करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातील पिवळ्या रंगाची पॅगो कंपनीची मालवाहू गाडी (एमएच १४ एफटी १०६७) तपासली असता त्यामध्ये २३ भरलेले गॅस सिलेंडर आढळून आले. हे सिलेंडर अवैधरित्या साठवून चढ्या भावाने विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक केली जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.
कारवाईदरम्यान ६९ हजार रुपयांचे गॅस सिलेंडर आणि १ लाख रुपयांची मालवाहू गाडी असा एकूण १ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आवश्यक वस्तू अधिनियम तसेच बीएनएसच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उत्तर चाकण पोलीस करत आहेत.


