शबनम न्यूज | प्रतिनिधी
खासदार श्रीरंग बारणे आणि शिवसेना गटनेते विश्वजित बारणे यांच्या सहकार्यातून ताथवडे येथे वनराई उभारण्यात येत आहे. येथे आतापर्यंत आठ लाख देशी झाडे लावली आहेत. दहा लाख झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडे लावल्यानंतर भविष्यात ६५ हजार क्यूसेक कार्बन कमी होईल, असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला.
‘जागतिक पर्यावरण दिना’चे औचित्य साधून शासकीय पशु पैदास प्रक्षेत्र, ताथवडे येथे ‘ओरिएअर्थ निसर्ग फाउंडेशन’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वृक्षरोपण सोहळ्याला खासदार बारणे यांची प्रमुख उपस्थिती होती. युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव तथा नगरसेवक विश्वजीत बारणे, शिवसेना वैद्यकीय कक्ष पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख श्रीकांत नवले, शासकीय पशु पैदास प्रक्षेत्र ताथवडेचे सहाय्यक आयुक्त उपेंद्र गायकवाड, प्रशासन अधिकारी दैवशाली चव्हाण, कृषी अधिकारी राजवर्धन घोगरे, कुंदन हुंडाईचे एमडी हितेश चड्डा, ओरिएअर्थ निसर्ग फाउंडेशनचे अध्यक्ष जीवन शेवाळे, डॉ. विनायक चौव्हाण, सी आर रामास्वामी, अक्षय मोहोळकर, आदित्य इंगळे आणि रेवन काकडे उपस्थित होते. ‘ओरिएअर्थ निसर्ग फाउंडेशन’ने पाच वर्षे झाडे जगवण्याची जबाबदारी घेतली आहे.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, आठ लाख झाडांची लागवड केली आहे. कुंदन हुंडाईच्या सीएसआर फंडातून झाडांची लागवड केली आहे. दहा लाख झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडे लावल्याने ६५ हजार क्यूसेक कार्बन कमी होईल. कार्बन कमी करणारी देशी जातीची झाडे आहेत. महापालिकेची शहरात २०३ उद्याने आहेत. या उद्यानात मोठ्या प्रमाणात झाडे लावली आहेत. ही झाडे जगवण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. झाडांची केवळ लागवड करणे पुरेसे नाही, तर त्यांची योग्य निगा राखणे आणि त्यांना जगविणे हे प्रशासनाबरोबरच प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.
शहर प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प
सामाजिक बांधिलकीतून शहर स्वच्छ ठेवणे, कचरा न करणे आणि पर्यावरण संवर्धनात सक्रिय सहभाग घेणे ही आपली सामूहिक जबाबदारी देखील आहे. ग्लोबल वार्मिंगचे मोठे संकट आहे. हवा, पाणी प्रदूषण वाढत आहे. हे टाळने नागरिकांच्या हातात आहे. प्लास्टिकमुक्त शहर व्हावे अशी इच्छा आहे. शहरातून वाहणारी पवना, इंद्रायणी नदी स्वच्छ व्हावी. नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे. शहर प्रदूषण मुक्त करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन पुढाकार घ्यावा, असे आवाहन खासदार बारणे यांनी केले.
पर्यावरणाचे रक्षण ही एका दिवसाची जबाबदारी नसून ती आपल्या जीवनशैलीचा भाग असायला हवी. सर्वांनी पृथ्वीला अधिक हिरवेगार बनवण्याचा निश्चय करावा. वाढत्या शहरीकरणात निसर्गाचा समतोल राखण्यासाठी केवळ झाडे लावणे नव्हे, तर त्यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे, असे नगरसेवक विश्वजीत बारणे म्हणाले.


