spot_img
spot_img
spot_img

उमेदवारीनंतर संपत्तीची चर्चा; विक्रम काकडे यांची आर्थिक ताकद किती?

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पुणे स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काकडे हे केवळ राजकीय घडामोडींमुळेच नव्हे, तर त्यांच्या प्रचंड संपत्तीमुळेही चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळाल्यानंतर आता त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातील मालमत्तेची माहिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, विक्रम काकडे यांच्याकडे सुमारे १५० कोटी रुपयांची मालमत्ता असून त्यामध्ये जंगम आणि स्थावर मालमत्तेचा मोठा समावेश आहे. प्रतिज्ञापत्रात नमूद केल्याप्रमाणे, काकडे यांच्याकडे ७८ कोटी ९५ लाख ६५ हजार ५३१ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. याशिवाय साडेसात लाख रुपयांची रोख रक्कम आणि विविध बँकांमध्ये सुमारे २९ लाख ५३ हजार रुपयांच्या ठेवी आहेत.

काकडे यांच्या संपत्तीमध्ये मौल्यवान धातू आणि आलिशान वस्तूंचाही समावेश आहे. त्यांच्या नावावर ४१० ग्रॅम सोने, पाच किलोहून अधिक चांदी, महागडी घड्याळे, लक्झरी कार आणि आलिशान बोट असल्याची माहिती प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे. तसेच बांधकाम क्षेत्रात त्यांनी सुमारे १५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

विशेष बाब म्हणजे, काकडे यांच्याकडे ५० लाख रुपये किमतीची परवानाधारक शस्त्रे असल्याचेही प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर त्यांनी विविध व्यक्ती आणि कंपन्यांना कोट्यवधी रुपयांची कर्जे दिली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये जय पवार यांना १० कोटी रुपये, तर परवेज ग्रँट यांना २ कोटी १७ लाख रुपये कर्ज दिल्याचा उल्लेख आहे.

स्थावर मालमत्तेच्या बाबतीतही काकडे कुटुंबाची आर्थिक ताकद दिसून येते. विक्रम काकडे यांच्या नावावर ७४ कोटी ७ लाख रुपयांची मालमत्ता, तर त्यांच्या पत्नी देविका काकडे यांच्या नावावर ९ कोटी १९ लाख रुपयांची मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद आहे.

याशिवाय, विक्रम काकडे यांचे दुबईमध्ये आलिशान घर असल्याची माहितीही समोर आली असून त्यामुळे त्यांच्या संपत्तीबाबत अधिक चर्चा रंगू लागली आहे.

दरम्यान, पुणे विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी जाहीर झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीचे सूर उमटत असतानाच, आता विक्रम काकडे यांच्या आर्थिक सामर्थ्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. आगामी निवडणुकीत ही चर्चा कितपत परिणामकारक ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!