शबनम न्यूज | प्रतिनिधी
NEET-UG 2026 परीक्षेतील कथित पेपर लीक प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस (RCC) यांच्या पिंपरी-चिंचवड व पुणे येथील सर्व शाखांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मारुती गणपत जाधव यांनी पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, NEET-UG 2026 परीक्षेतील कथित पेपर लीक प्रकरणाचा तपास केंद्रीय यंत्रणांकडून सुरू असून या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच संबंधित शैक्षणिक संस्थांचे परवाने रद्द करून त्यांच्या शाखा बंद करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
मारुती जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित अशा गंभीर प्रकरणांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर परिणाम होत असल्याचे नमूद केले आहे. तसेच विद्यार्थ्यांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास टिकवण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.
निवेदनात RCC क्लासेसच्या पिंपरी-चिंचवड व पुणे येथील सर्व शाखांची चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच मागील काही वर्षांतील प्रवेश परीक्षा प्रक्रियेची सखोल चौकशी व्हावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, परीक्षेतील गैरप्रकारांमुळे प्रभावित विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, नुकसानभरपाईबाबत विचार व्हावा आणि शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकता व विश्वासार्हता कायम राखण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड आणि पुणे ही शैक्षणिक केंद्रे म्हणून देशभरात ओळखली जात असल्याने विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहून तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा मारुती जाधव यांनी व्यक्त केली आहे.


