spot_img
spot_img
spot_img

संरक्षण क्षेत्रात भारत आत्मनिर्भर! – डॉ. काशिनाथ देवधर

शबनम न्यूज | प्रतिनिधी

‘संरक्षण क्षेत्रात एकेकाळी शस्त्रास्त्रे आयात करणारा भारत आता आत्मनिर्भर झाला असून शस्त्रास्त्रे निर्यात करू लागला आहे!’ असे प्रतिपादन सेवानिवृत्त शास्त्रज्ञ डाॅ. काशिनाथ देवधर यांनी स्वर्गीय दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था सभागृह, निगडी प्राधिकरण येथे गुरुवार, दिनांक ०७ मे २०२६ रोजी केले. मधुश्री कला आविष्कार आणि स्वर्गीय दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था, निगडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय मधुश्री व्याख्यानमालेत ‘आत्मनिर्भर भारत’ या विषयावरील द्वितीय पुष्प गुंफताना डॉ. काशिनाथ देवधर बोलत होते. उद्योजक अतुल इनामदार अध्यक्षस्थानी होते. नगरसेवक कैलास कुटे, मधुश्री कला आविष्कारच्या अध्यक्षा माधुरी ओक, कार्याध्यक्ष सलीम शिकलगार, सचिव राजेंद्र बाबर, कोषाध्यक्ष अजित देशपांडे, दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष प्रदीप पवार, शास्त्रज्ञ डाॅ. अशोक नगरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सलीम शिकलगार यांनी प्रास्ताविकातून, सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी अन् ज्ञानार्जन व्हावे म्हणून सोळा वर्षांपूर्वी मधुश्री व्याख्यानमालेचा प्रारंभ करण्यात आला, अशी माहिती दिली. अतुल इनामदार यांनी अध्यक्षीय मनोगतातून, ‘माननीय पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून आत्मनिर्भर भारत या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. संरक्षण क्षेत्रात त्यामुळे आमूलाग्र बदल झाला आहे!’ असे मत व्यक्त केले.

डॉ. काशिनाथ देवधर पुढे म्हणाले की, ‘आज ‘ऑपरेशन सिंदूर’चा पहिला वर्धापनदिन आहे. १९७१ मध्ये युद्धात पराभव स्वीकारल्यानंतर आपण भारताशी समोरासमोर लढू शकत नाही, ही गोष्ट पाकिस्तानच्या लक्षात आली. त्यामुळे पाकिस्तान दहशती कारवाया करू लागला. उरीच्या हल्ल्यानंतर आपण पहिला सर्जिकल स्ट्राईक केला. त्यानंतर पुलवामा घटनेनंतर आपण एअर स्ट्राईक केला. त्यानंतर पाकिस्तानने पहलगाम येथे दु:साहस केले. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून त्याचे प्रत्युत्तर देताना भारताने पाकिस्तानातील नऊ तळ उद्ध्वस्त केले. प्रगत तंत्रज्ञान आणि स्वदेशी प्रणालीची अचूक मारकता अन् विश्वासार्हता यामुळे संपूर्ण जग थक्क झाले. सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंह या महिला अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत हा हल्ला फक्त दहशतवादाच्या विरोधात होता, अशी माहिती दिली. त्यानंतर पाकिस्तानने केलेले सुमारे एक हजार अण्वस्त्र हल्ले भारताने हवेतल्या हवेत निष्प्रभ केले आणि उत्तरादाखल पाकिस्तानचे अकरा लष्करी तळ उद्ध्वस्त केले. यामुळे भारताच्या संरक्षण सामुग्रीची निर्यातक्षमता प्रचंड वाढली. ११ मे १९९८ रोजी यशस्वी अण्वस्त्र चाचणीमुळे भारत जगातील मोजक्याच अण्वस्त्रसज्ज देशांच्या पंगतीत जाऊन बसला. भारताने अवकाश संशोधन आणि संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याचा निर्णय घेतला. पृथ्वी, आकाश, त्रिशूल, नाग, अग्नी अशी क्षेपणास्त्रे निर्माण करून भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला दबदबा निर्माण केला. आक्रमण हेच संरक्षण हा अलिखित नियम युद्धशास्त्रात मानला जातो. तसेच तुमच्या संस्कृतीचे तत्त्वज्ञान कितीही प्रभावी आणि मानवतावादी असले तरी संरक्षणक्षमता मजबूत असल्याशिवाय जगात तुम्हाला कोणी किंमत देत नाही, हे सत्य भारताला उमगले. आपली अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रे आणि शस्त्रास्त्रे ही आपल्या संस्कृतीची ओळख सांगणारी असावीत, अशी कलाम यांची इच्छा असल्याने त्यांचे नामकरण वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने करण्यात आले आहे. भारताने भूदल, नौदल, हवाईदल अशा तिन्ही प्रकारात वेगवेगळ्या शस्त्रास्त्रांच्या उत्पादन आणि निर्यातीच्या माध्यमातून आत्मनिर्भरता संपादन केली आहे. विशेषत: २०१४ नंतर या क्षेत्रात भारताने उल्लेखनीय यश संपादन केले. एकेकाळी संरक्षण तंत्रज्ञान आणि सामुग्री आयात करणारा भारत आता या क्षेत्रातील प्रमुख निर्यातदार झाला आहे!’ चित्रफितीच्या माध्यमातून देवधर यांनी विषयाची विस्तृत मांडणी केली.

अश्विनी कुलकर्णी, राज अहेरराव, प्रा. पी. बी. शिंदे, चिंतामणी कुलकर्णी, चंद्रकांत शेडगे, मिलिंद कुलकर्णी यांनी संयोजनात सहकार्य केले. उज्ज्वला केळकर यांनी सूत्रसंचालन केले. मनीषा मुळे यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने समारोप करण्यात आला.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!