काळेवाडी परिसर हादरला ; आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी युनूस खतीब
पिंपरी-चिंचवड शहरातील थेरगाव परिसरात एका 19 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे काळेवाडी परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुभान शेख (वय 19) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. थेरगाव येथील शिवशंकर कॉलनी परिसरातील श्रीकृष्ण दूध डेअरी समोर गुरुवारी रात्री ही घटना घडली. सुभान शेख याच्यावर काही आरोपींनी धारदार शस्त्राने वार करत गंभीर जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुभानला नागरिकांनी तातडीने रुग्णालयात हलविले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच काळेवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून पुरावे गोळा केले आहेत. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात हत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती काळेवाडी पोलिसांनी दिली.
दरम्यान, या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून वैमनस्यातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस तपास करत आहेत.



