शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज शासकीय सुट्टीच्या दिवशी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएमएच) आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका पदव्युत्तर संस्थेला अचानक भेट देत विविध विभागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी रुग्णालयातील आरोग्य सुविधा, उपचार व्यवस्था, वैद्यकीय यंत्रणा तसेच नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा सविस्तर आढावा घेतला.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अतिदक्षता विभाग (ICU), नवजात शिशु अतिदक्षता विभाग (NICU), मेडिसिन विभाग, शस्त्रक्रिया विभाग, बालरोग विभाग, अस्थिरोग विभाग, कान-नाक-घसा विभाग (ENT), दंतचिकित्सा विभाग, अल्ट्रासोनोग्राफी विभाग (USG), क्ष-किरण विभाग (X-Ray), डायलिसिस विभाग, बाह्यरुग्ण विभाग (OPD), आपत्कालीन विभाग तसेच उष्माघात कक्षाची पाहणी केली. प्रत्येक विभागातील उपचार पद्धती, रुग्णसंख्या, वैद्यकीय सुविधा, उपलब्ध उपकरणे आणि सेवा व्यवस्थेबाबत त्यांनी माहिती घेतली.
भेटीदरम्यान आयुक्तांनी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी थेट संवाद साधत रुग्णालयात मिळणाऱ्या सुविधांबाबत अभिप्राय जाणून घेतला. यावेळी उपस्थित रुग्णांनी त्यांना मिळत असलेल्या सेवा सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले. आरोग्य सेवा अधिक परिणामकारक, तत्पर आणि नागरिकाभिमुख पद्धतीने देण्यासाठी आवश्यक त्या सूचना आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना रुग्णालयातील विविध विभाग, उपलब्ध सुविधा, वैद्यकीय सेवा, मनुष्यबळ तसेच भविष्यातील नियोजन याबाबत सविस्तर माहिती देत सादरीकरण केले.
यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय हे पिंपरी चिंचवड शहरातील महत्त्वाचे सार्वजनिक आरोग्य केंद्र असून येथे पदव्युत्तर वैद्यकीय संस्था, बी.एस्सी. नर्सिंग संस्था, वायसीएम ब्लड सेंटर, मासुळकर नेत्र रुग्णालय, स्वतंत्र ॲम्ब्युलन्स केंद्र अशा विविध सुविधा नागरिकांना येथे दिल्या जातात. शहरातील नागरिकांना परवडणाऱ्या आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात वायसीएम रुग्णालय महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सुलभ आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे तसेच उपलब्ध सुविधांमध्ये सातत्याने सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले.
या भेटीदरम्यान सह. प्राध्यापक डॉ. किशोर सूर्यवंशी, डॉ. मोहन वाघमारे, सिनियर सिस्टर शबनम सय्यद तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.




