spot_img
spot_img
spot_img

तडीपार आरोपीकडून गावठी कट्टा जप्त; तळेगाव एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

तळेगाव परिसरात तडीपार आदेशाचा भंग करून बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीला पोलिसांनी रंगेहात पकडत त्याच्याकडून गावठी कट्टा व जिवंत काडतूस जप्त केले. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, तळेगाव एमआयडीसी पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई ३० एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे २.४० वाजण्याच्या सुमारास वराळे-आंबी रोड ते आशियाना सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत, ता. मावळ, जि. पुणे येथे करण्यात आली. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०५/२०२६ नोंद करण्यात आला आहे.

या प्रकरणी आरोपी अनिल जगन जाधव (वय २६, रा. समता कॉलनी, वराळे, ता. मावळ) याला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, संबंधित आरोपीस पोलीस उपायुक्त परिमंडळ-२ यांच्या आदेशानुसार २९ सप्टेंबर २०२५ रोजी दोन वर्षांसाठी पुणे जिल्हा व खालापूर तालुक्यातून तडीपार करण्यात आले होते. असे असतानाही आरोपी आदेशाचे उल्लंघन करून आंबी गाव हद्दीत आढळून आला.

पोलिसांनी झडती घेतली असता आरोपीकडून सुमारे २५ हजार रुपये किमतीचा देशी बनावटीचा लोखंडी गावठी कट्टा (पिस्तूल) व १ हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. संबंधित शस्त्रावर पितळेची बॉडी, लोखंडी बॅरल आणि लाकडी कव्हर असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

याशिवाय, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने लागू केलेल्या मनाई आदेशांचे (महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३)) उल्लंघन केल्याप्रकरणी तसेच भारतीय हत्यार कायदा १९५९ अंतर्गतही आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीस हवालदार मरागजे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करत आहेत. पोलिसांनी अशा प्रकारच्या गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशाराही दिला आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!