कामगार दिनी सहलीचा आनंद ठरला जीवघेणा; रेस्क्यू पथकांचे अथक प्रयत्न निष्फळ
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
तळेगाव दाभाडे/मावळ, दि. १ मे २०२६ मावळ तालुक्यात कामगार दिनाच्या सुट्टीत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणांवर काळाने घाला घातला असून, दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण चार जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. जाधववाडी धरण (नवलाख उंबरे) येथे तिघांचा तर साळुंब्रे येथील पवना नदीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
जाधववाडी धरणात तिघांचा मृत्यू
जाधववाडी धरण परिसरात फिरण्यासाठी आलेल्या काही पर्यटकांनी उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी पाण्यात उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र, पाण्याची खोली व प्रवाहाचा अचूक अंदाज न आल्याने पाच जण अचानक बुडू लागले.
यामध्ये अजय गारुडे, संतोष एडके आणि अनिकेत पवार या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्थानिक ग्रामस्थांनी धाडस दाखवत दोघांना सुखरूप बाहेर काढले, मात्र उर्वरित तिघांना वाचवता आले नाही.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाले. बुडालेल्या तरुणांना बाहेर काढून तत्काळ सीपीआर देण्यात आला, मात्र वेळ निघून गेल्याने त्यांना जीवदान देता आले नाही.
पवना नदीत एकाचा बळी
दुसरी घटना साळुंब्रे येथील जुन्या दगडी पुलाजवळ घडली. मनोज भारत गौतम (वय २५, मूळ रा. उत्तर प्रदेश) हा तरुण सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास नदीत पोहण्यासाठी उतरला होता. पाण्याची खोली न समजल्याने तो बुडाला.
मनोज हा स्थानिक काळोखे पाईप लाईन कंपनीत कार्यरत होता. या घटनेने सहकाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
बचावकार्य; तीन संस्थांचा संयुक्त प्रयत्न
घटनेनंतर वन्यजीव रक्षक मावळ संस्था, शिवदुर्ग मित्र लोणावळा आणि NDRF च्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संयुक्त बचावमोहीम राबवली. अथक प्रयत्नांनंतर सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले.
जाधववाडी येथील मृतदेह ‘विरा ॲम्बुलन्स’द्वारे तळेगाव दाभाडे येथील जनरल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, तर साळुंब्रे येथील मृतदेह पवना हॉस्पिटलमध्ये पुढील प्रक्रियेसाठी दाखल करण्यात आला.
रेस्क्यू टीमचे उल्लेखनीय योगदान
या मोहिमेत निलेश गराडे, अनिल आंद्रे, भास्कर माळी, विनय सावंत, कमल परदेशी, शुभम काकडे, विकास दोड्डी, भारत मेहेंदळे, कमलेश राक्षे, सर्जेस पाटील, विकी दौंडकर, अविनाश कार्ले, रवी कोळी, कुंदन भोसले, हर्षद काळोखे, राजू सय्यद, करण भांगरे तसेच ‘विरा ॲम्बुलन्स’च्या टीमने मोलाची भूमिका बजावली.
प्रशासनाचे आवाहन
उन्हाळ्यात धरण, तलाव आणि नदी परिसरात पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी, पाण्याची खोली व प्रवाहाची माहिती घ्यावी, तसेच सुरक्षितता साधनांशिवाय पाण्यात उतरू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या चार तरुणांचा मृत्यू हा अत्यंत दुर्दैवी प्रकार असून, अशा घटनांमुळे प्रशासनाने तसेच नागरिकांनीही अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.




