spot_img
spot_img
spot_img

पिंपरी-चिंचवडमध्ये कर्मचाऱ्यांचा इशारा : धरणे आंदोलन व लाक्षणिक उपोषणाची घोषणा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ आता आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय लिपिक संवर्गीय हक्क परिषद तसेच शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचार कर्मचारी मंच यांच्या वतीने धरणे आंदोलन आणि लाक्षणिक उपोषणाची घोषणा करण्यात आली आहे.

महानगरपालिकेतील वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. यासंदर्भात वारंवार पाठपुरावा करूनही ठोस निर्णय न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर आता कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला असून, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मार्ग निवडण्यात आला आहे.

या आंदोलनात मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी होणार असून, त्यांच्या कुटुंबीयांचाही पाठिंबा मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. कर्मचारी संघटनांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत लवकरात लवकर मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असेही नमूद केले आहे.

हे धरणे आंदोलन बुधवार, दि. 29 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीसमोर, आयुक्त गेट येथे होणार आहे.

संघटनेचे नेते संजय (बापू) जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडणार असून, कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.

महापालिकेतील वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचाऱ्यांच्या सेवा प्रवेश नियमांमध्ये सुधारणा, पदोन्नतीतील अडथळे दूर करणे, वेतनवाढ, कंत्राटी व तात्पुरत्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न, तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांच्या हक्कांबाबतच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. विशेषतः सेवा प्रवेश नियम 2020 मध्ये तात्काळ सुधारणा करून नवीन नियम अंतिम करणे, तसेच कर्मचाऱ्यांना न्याय्य पदोन्नती व वेतनश्रेणी लागू करणे या प्रमुख मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

याशिवाय, सफाई कर्मचारी, कचरा व्यवस्थापन कर्मचारी, तसेच विविध विभागांतील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना (10, 20, 30 वर्षे) लागू करणे, एल.एस.जी.डी. व एल.जी.एस. परीक्षांमध्ये पात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांना लाभ देणे, तसेच सेवेत पारदर्शकता आणण्याची मागणीही करण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, “कामगारांचा आवाज दाबला जाणार नाही; हक्क मिळेपर्यंत थांबणार नाही.” त्यामुळे प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

या आंदोलनात मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी होण्याची शक्यता असून, महापालिकेच्या कामकाजावर त्याचा परिणाम होण्याची चिन्हे आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!