पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
हिंजवडी परिसरात भररस्त्यात राँग साईडने बेदरकारपणे रिक्षा चालवत नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या रिक्षाचालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ एप्रिल रोजी दुपारी पावणेएकच्या सुमारास शिवाजी चौकाजवळील एसबीआय बँकेसमोरील सार्वजनिक रस्त्यावर ही घटना घडली. फिर्यादी मोहम्मद सलमान हे मित्रासोबत त्या परिसरातून जात असताना आरोपी रिक्षाचालकाने रिक्षा क्रमांक एमएच १२ एलवाय १०६५ ही निष्काळजी व बेदरकारपणे राँग साईडने चालवली.
या प्रकारामुळे फिर्यादी व त्यांच्या मित्राच्या जीवितास धोका निर्माण झाला. नागरिकांच्या सुरक्षेला धोका पोहोचेल अशा पद्धतीने वाहन चालवल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली.
या प्रकरणी आरोपी बाबासाहेब सखाराम सोळंके या रिक्षाचालकाविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४, ११९/१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांदे करीत आहेत.




