पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी निघोजे परिसरात सुरू असलेल्या ‘श्री फाईव्ह’ नावाच्या जुगार अड्ड्यावर धाड टाकत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कारवाईदरम्यान रोख रक्कम आणि जुगार साहित्य जप्त करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ एप्रिल रोजी सायंकाळी ७.५५ वाजण्याच्या सुमारास सप्तरंग रेस्टोबारजवळ, महिंद्रा कंपनी गेट क्रमांक २ समोर, निघोजे (ता. खेड) येथे गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकण्यात आला.
या कारवाईत आरोपी इस्तेखार हक्कीमुदीन अन्सारी (वय ६७) आणि बरकतअली किसमतअली शेख (वय ४५) हे ‘श्री फाईव्ह’ नावाचा जुगार चालवत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम, जुगार खेळण्याची साधने असा एकूण ७ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दोन्ही आरोपी हे महाळुंगे परिसरात भाड्याच्या खोलीत वास्तव्यास असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ चे कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना बीएनएसएस २०२३ कलम ३५(३) प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे.
पुढील तपास पोलीस शिपाई हनमंते करीत आहेत.




