पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
काळेवाडी फाटा परिसरात मोकळ्या जागेत सुरू असलेल्या तीन पत्ती जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या युनिट-२ पथकाने धाड टाकत पाच जणांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत रोख रक्कम व जुगार साहित्य जप्त करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गोकुळ स्वीटमागे, इलेक्ट्रिक टॉवरलगत असलेल्या मोकळ्या जागेत, काळेवाडी फाट्याजवळ काही जण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार छापा टाकण्यात आला.
कारवाईदरम्यान आरोपी किसन जसवंत निरवणे (वय ५९), काजी रोते श्रेष्ठ (वय ३९), मेघराज देकराज आर्यन (वय ४३), गणेश डंबर शर्मा (वय ४६) आणि महादेव दिगंबर सानप (वय ४४) हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तीन पत्ती जुगार खेळताना आढळून आले.
पोलिसांनी घटनास्थळावरून ९ हजार ८०० रुपये रोख रक्कम तसेच जुगाराचे साहित्य जप्त केले. आरोपींना बीएनएसएस कलम ३५(३) प्रमाणे नोटीस बजावण्यात आली आहे.
या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अॅक्ट कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मेटे करीत आहेत.




