पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब
सोशल मीडियावरील जाहिरातीच्या माध्यमातून गुंतवणुकीचे आमिष दाखवत तब्बल २५.३० लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार तळेगाव दाभाडे परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर पोलिस तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. २६ जानेवारी २०२६ ते ६ मार्च २०२६ या कालावधीत सोमाटणे (ता. मावळ) येथे घडली. फिर्यादी व्यक्ती (नाव गोपनीय) इंस्टाग्रामवर व्हिडिओ पाहत असताना ‘HDFC Securities Advance Broker Account’ या नावाची जाहिरात त्यांच्या नजरेस पडली.
या जाहिरातीवर विश्वास ठेवत त्यांनी संबंधित ट्रेडिंग अकाउंट जॉईन केले. त्यानंतर त्यांना एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये (C-122 HDFC Securities) अॅड करण्यात आले. या ग्रुपमधील अज्ञात व्यक्तीने स्वतःला HDFC सिक्युरिटीजचा प्रतिनिधी असल्याचे भासवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला.
यानंतर आरोपीने फिर्यादीला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. फिर्यादीने विश्वासाने टप्प्याटप्प्याने २५,३०,००० रुपये गुंतवले. मात्र, गुंतवणुकीनंतर ना शेअर्सचे कोणतेही वाटप करण्यात आले, ना गुंतवणुकीवर परतावा देण्यात आला.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (२), ३१८ (४), ३१९ (२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (C), ६६ (D) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांनी अशा ऑनलाइन गुंतवणूक योजनांपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.




