spot_img
spot_img
spot_img

गुडविल केमिकल्समध्ये ४१ लाखांचा अपहार; विश्वासू नोकरच ठरले ‘गद्दार’, तिघांविरुद्ध गुन्हा

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब

भोसरीतील गुळवे वस्ती परिसरात असलेल्या केमिकल दुकानातून तब्बल ४१ लाखांहून अधिक रकमेचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, दुकानातील विश्वासू नोकरांनीच संगनमत करून ही फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे.

या प्रकरणी अमित श्रीरामजी दरक (वय ४१, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार राजेंद्र हनुमान कासट, संदीप ज्ञानदेव सदाशिव आणि बाबुराव बोराडे (रिक्षाचालक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १ ऑगस्ट २०२३ ते २४ मार्च २०२५ या कालावधीत भोसरीतील गुडविल केमिकल्स शॉपमध्ये हा प्रकार घडला. फिर्यादी यांनी आरोपींवर विश्वास ठेवून कामावर ठेवले होते. मात्र आरोपींनी या विश्वासाचा गैरफायदा घेत, संगनमत करून दुकानातील लिक्विड व पावडर स्वरूपातील केमिकल्स माल चोरीछुप्या पद्धतीने विक्रीस काढला.

या बेकायदेशीर विक्रीतून आरोपींनी तब्बल ४१,८२,६१४ रुपये स्वतःच्या फायद्यासाठी अपहार केल्याचे उघड झाले आहे. दीर्घकाळ सुरू असलेल्या या गैरप्रकारामुळे व्यावसायिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी भोसरी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (४), ३१८ (४), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून तिघा आरोपींचा शोध सुरू आहे.

या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक टापरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आणखी काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!