शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपळे गुरव येथील कै. काळूराम जगताप बॅडमिंटन हॉलमधील आरोग्य कोठीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एक सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेपासून संरक्षण मिळावे या उद्देशाने ओम साई फाउंडेशनचे अध्यक्ष संजय मराठे यांच्या वतीने आरोग्य कर्मचाऱ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले.
शहराच्या स्वच्छतेसाठी आणि आरोग्यासाठी रणरणत्या उन्हात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा विचार करून त्यांना उष्माघातापासून बचावासाठी टोपी, अॅप्रन आणि वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मास्कचे वितरण करण्यात आले. हे साहित्य नगरसेवक माऊलीशेठ जगताप आणि संजय मराठे यांच्या हस्ते देण्यात आले.

या उपक्रमाबद्दल बोलताना सामाजिक कार्यकर्ते साई कोंढरे यांनी सांगितले की, “समाजासाठी झटणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची जाणीव ठेवून ओम साई फाउंडेशन दरवर्षी असे उपक्रम राबवत असते. हा उपक्रम माणुसकीचे उत्तम उदाहरण आहे.”
यावेळी नगरसेवक माऊली जगताप यांनी सर्व नागरिकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देत, “उन्हाची तीव्रता वाढत असल्याने प्रत्येकाने स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी,” असे आवाहन केले.
या कार्यक्रमास नगरसेवक माऊली जगताप, ओम साई फाउंडेशनचे अध्यक्ष संजय मराठे, आरोग्य निरीक्षक स्नेहल सोनवणे, आरोग्य मुकादम अरुण जगताप, बेसिक वॉर्ड इन्चार्ज सुनील धावारे, सामाजिक कार्यकर्ते तौफिक सय्यद, रमेश गाढवे, साई कोंढरे, सचिन खराडे, जगदीश बच्छाव तसेच आरोग्य कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




