पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
चाकण परिसरात बेकायदेशीर हातभट्टी दारू निर्मितीवर पोलिसांनी कारवाई करत मोठ्या प्रमाणात कच्चा माल व साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या फरार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १२ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे १.४० वाजण्याच्या सुमारास बहूळ गावाच्या हद्दीतील गायरान परिसरातील नाल्याच्या कडेला ही कारवाई करण्यात आली. चाकण दक्षिण पोलीस स्टेशनच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार येथे हातभट्टी दारू तयार करण्याची तयारी सुरू होती.
छापा टाकला असता, आरोपी रोहित जयंती राजपूत (वय २८, रा. साबळेवाडी, ता. खेड) याच्या ताब्यात पांढऱ्या रंगाचे पाच प्लास्टिक बॅरल आढळून आले. प्रत्येक बॅरलमध्ये सुमारे ५०० लिटर क्षमतेचे हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन व अन्य साहित्य साठवलेले होते. पोलिसांनी अंदाजे ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ६५(फ) अन्वये चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहे. त्याचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत.




