पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
पिंपरी-चिंचवड शहरातील हिंजवडी परिसरात भरधाव टेम्पोच्या धडकेत २३ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी चालकाला अटक करत गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ११ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास माण रोडवरील भारत पेट्रोल पंपाजवळ, प्रभाकर पारखी फ्लोअर मिलसमोर घडली. यश रविंद्र कुंभारे (वय २३, रा. नागपूर) हा आपल्या होंडा अॅक्टिव्हा (MH 14 FQ 1642) वरून जात असताना, टाटा कंपनीच्या टेम्पो (MH 03 EG 4886) चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवत जोरदार धडक दिली.
या अपघातात यश कुंभारे गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, संबंधित वेळेत जड वाहनांना प्रवेशबंदी असतानाही आरोपी चालकाने नियमांचे उल्लंघन करून वाहन चालवले. वाहतूक नियमांचा भंग करत निष्काळजीपणे वाहन चालविल्यामुळे हा अपघात घडल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी फिर्यादी रविंद्र पांडुरंग कुंभारे (वय ५३) यांच्या तक्रारीवरून हिंजवडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०५, १२५ (अ)(ब), ३२४(४) तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी चालक दिलीप मधुकर वाकचौरे (वय ४६, रा. मुंबई) याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.




