पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
देहूरोड परिसरात अधिक परताव्याच्या आमिषाने आर्थिक फसवणुकीचा प्रकार समोर आला असून, एका महिलेस तब्बल १५ लाख २५ हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने ५ ते ७ टक्के हमखास परतावा देण्याचे आमिष दाखवून फिर्यादी महिलेसह तिच्या ओळखीतील व्यक्तीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादीकडून क्रेडिट कार्डद्वारे १५.२५ लाख रुपये गुंतवणूक करून घेतली. सुरुवातीला विश्वास बसावा म्हणून आरोपीने २ लाख ५ हजार रुपये परतावा दिला; मात्र त्यानंतर उर्वरित रक्कम परत न करता फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
ही घटना दि. १६ जुलै २०२५ ते ०३ मार्च २०२६ दरम्यान क्रीसांता रकाय लाईन सोसायटी, किवळे (ता. हवेली, जि. पुणे) येथे घडली. याबाबत दि. ०४ एप्रिल २०२६ रोजी रात्री ८.०१ वा. गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणी सौरभ सुरेशचंद्र खटाटे (वय ३७, रा. आकुर्डी-रावेत परिसर) याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (२), ३१८ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी सध्या फरार आहे.
फिर्यादी महिलेसह अमेय ढवळे या साक्षीदारालाही आरोपीने गुंतवणुकीचे आमिष दाखवले असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, आर्थिक व्यवहार करताना अधिक सावध राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डोंगळे करत आहेत.




