शेजाऱ्यांशी वादातून संतापाचा कळस; रात्रीच्या सुमारास घरात घुसून हत्याकांड
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी – युनूस खतीब
आळंदी परिसरातील केळगाव येथे एकाच घरात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली आहे. सहा वर्षांच्या निरागस चिमुरडीसह ७० वर्षीय वृद्ध महिलेची निर्दयीपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाकर वस्ती, मुक्ताई सुपर मार्केटसमोर, हनुमानवाडी, केळगाव (ता. खेड, जि. पुणे) येथे ही घटना घडली. महिला फिर्यादी या इंद्रायणी हॉस्पिटल येथे रात्रपाळीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी आपल्या ६ वर्षीय नाती धनश्री हिला शेजारी राहणाऱ्या मंगल शिंदे (वय ७०) यांच्याकडे देखरेखीकरिता सोपवले होते.
दरम्यान, १ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेपासून ते २ एप्रिल सकाळी ८.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात कारणावरून वाद झाल्यानंतर आरोपी विनायक तुकाराम भवारी (वय ३१, रा. संगमनेर, जि. अहिल्यानगर) याने संतापाच्या भरात घरात घुसून दोघींवर हल्ला केला. धारदार हत्याराने वार करत दोघींची निर्घृण हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
महिला कामावरून परतल्यानंतर हा भीषण प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच आळंदी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व आरोपीला अटक केली.
या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सपोनि जाधव करीत आहेत.
या अमानुष घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.




