पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
दिवसा घरफोडी करून तब्बल १० तोळे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या महिला आरोपीला अवघ्या २४ तासांत अटक करत दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आरोपीकडून चोरीस गेलेला १३ लाख ८७ हजार रुपयांचा १०० टक्के मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात २२ एप्रिल रोजी घरफोडीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी यांच्या घरातील कपाटातून अज्ञात चोरट्याने १० तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची तक्रार पोलिसांकडे देण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली.
सीसीटीव्हीतून उलगडला गुन्हा
घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासताना एका महिलेचा संशयास्पद वावर आढळून आला. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी साxxxx संxxx भुजबळ (वय ३८, रा. पवार चाळ, जिजामाता चौक, तळेगाव दाभाडे) हिला ताब्यात घेतले. चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली.
परिचित असल्याचा गैरफायदा
तपासात आरोपी महिला ही फिर्यादींची परिचित असल्याचे समोर आले. घरातील दागिने कुठे ठेवले आहेत, याची तिला माहिती होती. त्याच माहितीचा फायदा घेत तिने बनावट चावीच्या साहाय्याने घराचे दार उघडून चोरी केल्याचे निष्पन्न झाले.
१०० टक्के मुद्देमाल जप्त
अटकेनंतर आरोपीकडून चोरीस गेलेले १० तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण चोरीचा मुद्देमाल परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस आयुक्त Vinay Kumar Choubey, सहपोलीस आयुक्त डॉ. Mahavarkar, अप्पर पोलीस आयुक्त Sarang Awad, अप्पर पोलीस आयुक्त Basavaraj Teli, पोलीस उपायुक्त Shweta Khedkar व सहाय्यक पोलीस आयुक्त Sachin Kadam यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस निरीक्षक अनिल देवडे तसेच तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई पार पाडली असून पुढील तपास सुरू आहे.




