पुणे | प्रतिनिधी – युनूस खतीब
पुणे दिनांक १ एप्रिल २०२६ शहरातील वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तालयाने राबविलेल्या “ऑपरेशन फ्लश आउट” या विशेष मोहिमेत केवळ ११ दिवसांत मोठी कारवाई उघडकीस आली आहे. दि. २० मार्च ते ३१ मार्च २०२६ दरम्यान राबविण्यात आलेल्या या मोहिमेत अवैध शस्त्रे, अमली पदार्थ आणि दारूबंदी कायद्याअंतर्गत शेकडो गुन्हे दाखल करत गुन्हेगारी साखळीला मोठा धक्का देण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या कालावधीत आर्म्स ॲक्ट आणि NDPS अंतर्गत एकूण ४२ गुन्हे नोंदविण्यात आले. शहरात बेकायदेशीर शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करत आर्म्स ॲक्ट कलम ४/२५ अंतर्गत २६ आणि कलम ३/२५ अंतर्गत ३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच अमली पदार्थांच्या विक्री व साठ्यावर लक्ष ठेवत NDPS अंतर्गत १३ गुन्हे नोंदवले गेले.
दारूबंदी कायद्यांतर्गतही पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर धडक कारवाई केली. एकूण १६६ गुन्हे दाखल करत १३४ आरोपींवर कारवाई करण्यात आली असून सुमारे ₹५.८१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात २१९९.९ लिटर गावठी दारू, १०८.५८ लिटर विदेशी दारू, ४० लिटर ताडी, २० लिटर रसायन तसेच १३३७ दारूच्या बाटल्या आणि १५३ गुटखा पाकिटांचा समावेश आहे.
सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांवरही पोलिसांनी अंकुश ठेवला आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १०२, १०३ व ११७ अंतर्गत १९५ जणांवर आणि हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली.
झोननिहाय कारवाईत झोन ६ ने सर्वाधिक आघाडी घेत तब्बल ६३९.२५ लिटर गावठी दारू, ताडी व रसायन नष्ट केले. तर झोन १, २ आणि ३ मध्ये दारू विक्री व गुटख्यावर मोठ्या प्रमाणावर छापेमारी करण्यात आली. झोन ४ व ५ मध्ये अवैध वाहतूक साखळीवर कारवाई करत वाहनांची तपासणी करण्यात आली, तर झोन ७ मध्ये शेकडो बाटल्या जप्त करून गुन्हे दाखल करण्यात आले.
पोलीस आयुक्तालयाच्या या कारवाईमुळे शहरातील अवैध धंद्यांवर मोठा आळा बसल्याचे चित्र असून, नागरिकांनीही अशा प्रकारांबाबत तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




