पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब
भोसरीतील सद्गुरु नगर परिसरात पत्नीने आपल्या प्रियकरासोबत संगनमत करून पतीवर अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहेत.
दि. २८ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी अमोल संग्राम ढवळे (वय २८) यांना त्यांच्या पत्नीने भोसरी येथे बोलावून घेतले. त्यानंतर आरोपी महिलेने आपल्या प्रियकर अजय नात्रे (वय अंदाजे ३०) याच्या मदतीने फिर्यादीला घरात नेले.
तेथे दोघांनी मिळून फिर्यादीला जबरदस्तीने दारू पाजली. त्यानंतर आरोपींनी हाताने तसेच रबरी पाईपने बेदम मारहाण केली. पुढे अजय नात्रे याने लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या चेहऱ्यावर, मानेवर व पाठीवर वार करत गंभीर दुखापत केली.
विशेष म्हणजे, फिर्यादी मदतीसाठी ओरडत असताना आरोपी महिलेने घराचा दरवाजा आतून बंद करून या संपूर्ण मारहाणीचा मोबाईलमध्ये व्हिडीओ देखील शूट केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५, ३५१(३), ३(५) तसेच भादवि कलम ३२४, ३२३, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकरणाचा तपास मपोहोवा मुळे करीत असून आरोपींचा शोध सुरू आहे.




