शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ३७ नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र भाजपने ८४ नगरसेवकांच्या बळावर महापालिकेची सत्ता मिळवली असून, नुकतीच महापौरपदी रवी लांडगे यांची निवड जाहीर करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सक्षम, अनुभवी आणि प्रशासनाची सखोल जाण असलेल्या नेत्याची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती आवश्यक होती.
त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भाऊसाहेब भोईर यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड जाहीर करण्यात आली आहे. भाऊसाहेब भोईर हे गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणात सक्रिय असून, सलग पाच वेळा ते नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. प्रशासकीय कारभाराची अचूक माहिती, प्रशासनावर मजबूत पकड आणि आक्रमक पण संतुलित भूमिका ही त्यांची जमेची बाजू मानली जाते.
भाऊसाहेब भोईर हे सत्ताधाऱ्यांना जाब विचारणारे, जनहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडणारे आणि महापालिकेतील लोकशाही अधिक मजबूत करणारे सक्षम विरोधी पक्षनेते ठरतील, असा विश्वास राजकीय जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.


