शबनम न्यूज | प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेच्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, इतिहास विभाग आणि सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे योगदान” या विषयावर व्याख्यानचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून टिकराम जगन्नाथ महाविद्यालय,खडकी – पुणे. येथील इतिहास विभाग प्रमुख डॉ. प्रकाश पांढरमिसे हे उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे मा. प्र. प्राचार्य,डॉ. प्रभंजन चव्हाण हे होते.
प्रमुख व्याख्याते डॉ. प्रकाश पांढरमिसे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, अहिल्यादेवी होळकर या न्यायप्रियता, प्रामाणिक आणि लोकाभिमुख दृष्टिकोन असणाऱ्या अशा होत्या. . मंदिर पुनर्बांधणी, तीर्थक्षेत्रांचे संवर्धन, धर्मशाळा, घाट, पाणवठे व रस्त्यांची उभारणी या माध्यमातून त्यांनी केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक व सांस्कृतिक एकात्मतेचे कार्य केले. अहिल्यादेवींचे राज्य म्हणजे कल्याणकारी राजसत्तेचे उत्तम उदाहरण आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेल्या कार्याला ना सीमेची मर्यादा होती, ना भाषेची मर्यादा होती, ना प्रांताची मर्यादा होती, ना धर्माची मर्यादा होती. त्यांचे कार्य मानवतावादी व लोककल्याणकारी असेच होते. त्यांचे कार्य हे धर्मनिरपेक्ष, सर्वधर्मसमभाव, सहिष्णूता यांना प्राधान्य देणारे होते. त्यांच्या कार्याचा आदर्श हा आजच्या राज्यकर्त्यांना आदर्शदायी व अनुकरणीय आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कर्तृत्व हे केवळ इतिहासातील गौरवगाथा नसून आजच्या समाजव्यवस्थेसाठी मूल्यनिष्ठ मार्गदर्शक आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्र. प्राचार्य डॉ. प्रभंजन चव्हाण आपल्या अध्यक्षीय मनोगतात म्हणाले,. अहिल्यादेवी होळकर यांचा कारभार हा लोकशाही मूल्यांची पूर्वतयारी मानता येईल. स्त्री असूनही त्यांनी त्या काळातील सामाजिक बंधनांवर मात करून आदर्श प्रशासन उभे केले, अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचे ऐतिहासिक महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि इतिहास विभाग प्रमुख डॉ. संदीप नन्नावरे यांनी केले. आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रोग्राम ऑफिसर आणि कॉमर्स विभाग प्रमुख डॉ. बाबासाहेब कलापुरे यांनी मानले, तर सूत्रसंचालन डॉ. वैशाली सुपेकर यांनी केले.या वेळी ७२ विद्यार्थी उपस्थित होते.


