शबनम न्यूज | प्रतिनिधी
‘विश्वास, मेहनत व स्वयंशिस्त या त्रिसूत्रीने निश्चित यश प्राप्त होते!’ असे प्रतिपादन संत तुकारामनगर पोलीस स्थानकातील पोलीस उपनिरीक्षक हृषीकेश कांबळे यांनी सोहम् सार्वजनिक ग्रंथालय, पिंपरी येथे केले. ग्रंथालयाच्या वतीने ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कांबळे बोलत होते.
याप्रसंगी नवनिर्वाचित नगरसेवक जितेंद्र ननावरे, नगरसेविका वर्षा जगताप, सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ नेरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जगन्नाथ नेरकर यांनी प्रास्ताविकातून, सोहम् सार्वजनिक ग्रंथालय हे चोवीस तास अभ्यासिकेची सुविधा असलेले पिंपरी – चिंचवड शहरातील एकमेव ग्रंथालय आहे.
सोहम् मधील अभ्यासिकेतून आजतागायत हजारो विद्यार्थी प्रशासकीय सेवेत निवडले गेले असून आपली सेवा ते यशस्वीपणे पार पाडत आहेत. येथील संदर्भग्रंथांचा उपयोग विद्यावाचस्पती अर्थात पीएच. डी. च्या संशोधनासाठी आवर्जून करण्यात यावा, असे आवाहन केले. हृषीकेश कांबळे यांनी आपले अनुभव कथन करीत विद्यार्थ्यांशी हितगुज केले. भास्कर चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. परमेश्वर तेलंगे यांनी आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक व स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी उपस्थित होते.


