शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुण्यातील वाघोली परिसरात एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. एका आईने स्वतःच्या 11 वर्षांच्या मुलाचा गळा चिरून हत्या केली असून, याच वेळी तिने 13 वर्षांच्या मुलीवरही प्राणघातक हल्ला केला. या घटनेत मुलाचा जागीच मृत्यू झाला असून मुलगी गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे.
ही घटना वाघोली येथील बायफ रोड परिसरात घडली. सोनी संतोष जायभाय (मूळ रहिवासी – कंधार, जिल्हा नांदेड) या सध्या वाघोलीत वास्तव्यास होत्या. त्यांनीच आपल्या दोन अल्पवयीन मुलांवर हल्ला केल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात 11 वर्षीय साईराज संतोष जायभाय याचा मृत्यू झाला, तर 13 वर्षीय धनश्री संतोष जायभाय गंभीर जखमी झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी महिलेला ताब्यात घेतले आहे. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून कौटुंबिक वाद, मानसिक तणाव किंवा अन्य कारणांमुळे हा प्रकार घडला का, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.
वाघोली परिसरात अवघ्या दोन दिवसांत घडलेली ही दुसरी गंभीर घटना असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे स्थानिक नागरिकांनी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे.


