पिंपरी प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा निकाल मागील आठवड्यात जाहीर झाला असून, या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. एकूण 165 जागांपैकी भाजपने तब्बल 84 नगरसेवक निवडून आणत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. त्यामुळे महापौर पदावर कोण विराजमान होणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
22 जानेवारी रोजी पार पडलेल्या महापौर पदाच्या आरक्षण सोडतीत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसाठी महापौर पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. यामुळे भाजपमधील अनेक दिग्गज नेत्यांसाठी महापौरपदाची संधी खुली झाली असून, पक्षांतर्गत स्पर्धा अधिकच तीव्र झाली आहे.
शत्रुघ्न काटे – अनुभवी संघटक, पुन्हा एकदा संधी?
भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांचे नाव महापौर पदाच्या प्रमुख दावेदारांमध्ये आघाडीवर घेतले जात आहे. 2017 ते 2022 या भाजपच्या सत्ताकाळात त्यांनी अनेक वेळा महापौरपदासाठी प्रयत्न केले; मात्र त्यावेळी संधी मिळाली नाही. संघटनात्मक अनुभव, पक्षातील पकड आणि सातत्यपूर्ण कार्यशैली लक्षात घेता, यावेळी त्यांना संधी दिली जाईल का, याबाबत राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे.
तुषार हिंगे – कार्यक्षम नेतृत्वाला संधीची अपेक्षा
माजी उपमहापौर तुषार हिंगे यांचे नावही महापौर पदासाठी जोरकसपणे पुढे येत आहे. पिंपरी परिसरातून महापौर व्हावा, अशी कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. उपमहापौर म्हणून केलेले काम, प्रशासनावर असलेली पकड आणि सर्वसामान्य नगरसेवकांशी असलेले सुसंवाद हे त्यांचे बलस्थान मानले जाते.
राहुल कलाटे – नव्या पक्षात नवी संधी?
चार टर्म शिवसेनेतून नगरसेवक राहिलेले राहुल कलाटे यावेळी भाजपमध्ये प्रवेश करून मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा भाजपला होऊ शकतो, अशी भूमिका पक्षातील एका गटाची आहे. त्यामुळे “नव्या चेहऱ्याला संधी” या समीकरणात राहुल कलाटे यांचे नावही महापौर पदाच्या शर्यतीत महत्त्वाचे मानले जात आहे.
रवी लांडगे – बिनविरोध विजयाची ताकद
भोसरी विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा बिनविरोध निवडून आलेले रवी लांडगे हेही महापौर पदाच्या चर्चेत आहेत. भोसरी परिसरात त्यांचा मजबूत जनाधार असून, त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवडून येणे ही बाब पक्षासाठी महत्त्वाची मानली जात असून, त्याचे राजकीय वजन महापौर निवडीत निर्णायक ठरू शकते.
विजय उर्फ शीतल शिंदे – निष्ठावंत कार्यकर्त्याची दावेदारी
भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले विजय उर्फ शीतल शिंदे हे तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. मागील 25 वर्षांपासून भाजपशी निष्ठा राखत त्यांनी आपल्या प्रभागात अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत. “निष्ठा आणि कामगिरी” या निकषावर त्यांचे नावही महापौर पदासाठी चर्चेत आहे.
अंतिम निर्णय कोणाचा?
सध्या भाजपकडून महापौर पदासाठी कोणतेही अधिकृत नाव जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र, वरिष्ठ नेते, आमदार, संघटनात्मक नेतृत्व आणि प्रादेशिक समतोल या सर्व बाबींचा विचार करून अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवडच्या पहिल्या नागरिकाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, यासाठी अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.


