कैलासवासी मनिषा भाऊसाहेब भोईर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड: आपल्या शहरातील, समाजातील सर्वांनी आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत आपल्यावर आलेल्या संकटातूनच संधी शोधावे, मी नेहमी माझ्यावर आलेल्या संकटातून अनेक संधी शोधतो आणि त्यावर काम करतो, असे मत ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांनी व्यक्त केले. ते
कै. मनिषा भाऊसाहेब भोईर ट्रस्ट आणि पिंपरी-चिंचवड बचत गट महासंघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
कै. मनिषा भाऊसाहेब भोईर यांच्या सोळाव्या पुण्यस्मरणानिमित्त आदर्श माता पुरस्कार, विशेष सामाजिक कार्य पुरस्कार तसेच बचत गट विशेष सत्कार कार्यक्रम आज चिंचवड येथील मनिषा स्मृती निवास, भोईर नगर येथे भावपूर्ण वातावरणात पार पडला.

या पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांच्या शुभहस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी मानसी भोईर आणि किरण भोईर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने माता-भगिनी उपस्थित होत्या. महिलांचा उत्साह आणि सहभाग विशेष लक्षवेधी ठरला.
यावेळी उपस्थित महिलांनी ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर आगामी महापालिका निवडणूक लढविण्याबाबत इच्छुक असल्याचे सांगत त्यांना जाहीर पाठिंबा दर्शविला. महिलांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान कै. मनिषा भाऊसाहेब भोईर यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. बोलताना भाऊसाहेब भोईर यांनी मनिषा भोईर यांच्या आठवणींवर आधारित भावनिक मनोगत व्यक्त केले. त्यांच्या सामाजिक संवेदनशीलतेचा आणि कुटुंबीयांसाठी असलेल्या योगदानाचा उल्लेख त्यांनी केला.
या कार्यक्रमाचे आयोजन हर्षवर्धन भोईर, मानसी घुले भोईर, किरण भोईर, गार्गी घुले आणि आर्यराज भोईर यांच्या वतीने करण्यात आले होते. पुरस्कारप्राप्त मान्यवरांचा सत्कार करत त्यांच्या कार्यास पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयोजक व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.



