कोथरूड : संविधान रक्षणाची जबाबदारी आपली सर्वांची, सर्व नागरिकांची आहे. आपले अधिकार दुसऱ्यांना हिसकवू देऊ नका. रस्त्यावर येऊन आंदोलन करणारा विरोधात दंडुका चालवला जात आहे. आंदोलनाच्या माध्यमातून सामुदायिक शक्ती निर्माण होते. संघर्षाचे जीवन माणसाला समृध्द बनवते. मोर्चा लोकांना चर्चेस प्रवृत्त करतो. असे प्रतिपादन युवक क्रांतीदालाचे माजी पूर्णवेळ कार्यकर्ते रंगा राचुरे यांनी केले.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल आयोजित २६ व्या गांधी दर्शन शिबीरात रंगा राचुरे यांनी, ’परिवर्तनाच्या प्रक्रियेत आंदोलनाचे महत्त्व काल आणि आज’ या विषयावर मांडणी केली. यावेळी व्यासपीठावर अन्वर राजन, लक्ष्मीकांत देशमुख उपस्थित होते.
गांधीभवन, कोथरूड येथे रविवारी झालेल्या या शिबीरात संभाजी ब्रिगेड चे कार्यकर्ते पैगंबर शेख यांनी ‘सर्व समावेशक समाजकारण आणि राजकारण’ आणि चैतन्य संस्थेच्या संस्थापक सुधा कोठारी यांनी ‘सामाजिक कार्यातील माझा प्रवास शोध आणि बोध’ या विषयावर मांडणी केली. अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी चे अन्वर राजन होते.
रंगा राचुरे म्हणाले की,
आता मोर्चा हा नेत्यांच्या प्रतिष्ठेचा मूद्दा बनला आहे. कार्यकर्त्याला नेत्यांची गरज नाही. नेत्यांना कार्यकर्त्यांची गरज असते. लोक राजकारणी बनले पाहिजे. बेधडक बोलणारे कार्यकर्ते नेत्यांना नको आहे. लोकांचा संघर्ष नेत्यांना वठणीवर आणेल.
रंगा राचुरे पुढे म्हणाले की, लोकशाही आपल्याला वाढवायची आहे. आंदोलन जेव्हा सत्तेला आव्हान देते तेव्हा सत्ता ते चिरडून टाकण्याचा प्रयत्न करते. तुरुंग आणि पोलिस अत्याचाराची भिंती घालवण्याचे काम गांधीजींनी केले. गांधी जन्माला येण्याची वाट पाहू नका. तुम्ही तुमच्या वार्डाचे गांधी व्हा. तुम्हाला जीथे जमेल तीथे बोला. बोलता येत नसेल तर फलक लावा. परिणाम होतो.
अन्वर राजन म्हणाले की, आपली लढाई ही धर्माच्या नावाखाली जो अधर्म सुरू आहे त्याविरोधात आहे. जे खरे वाटते ते बोलत राहिले पाहिजे.
पैगंबर शेख यांनी सांगितले की, संविधानाचा प्रचार प्रसार जास्त झाला पाहिजे. स़विधान घराघरात, मनामनात पोहचले पाहिजे. कारण त्यामुळे आपल्याला मूलभूत अधिकार मिळाले आहेत. सामाजिक चळवळीमुळे समाज विचार करायला प्रवृत्त झाला.
सुधा कोठारी म्हणाल्या की, बचत गटातून एक महासंघ तयार झाला. त्यामध्ये एक लाख सदतीस हजार महिला आहेत. आठवड्याला एक रुपया बचतीपासून सुरु झालेला हा प्रवास महिला सक्षमीकरणासाठी प्रभावी मार्ग बनला. महिलांचा आत्मविश्वास वाढला. त्यांचे आयुष्य बदलले. दारुबंदी, विवाह, वारसा, जमिन विषयक प्रश्न महिला सोडवू लागल्या. आंदोलन करणारे आणि रचनात्मक काम करणारे एकत्र येऊन परिवर्तन होवू शकते हे यातून सिध्द झाले.
तेजस भालेराव यांनी सुत्रसंचालन केले. प्रविण सप्तर्षी यांनी आभार मानले. अँड. गोपाळ गुणाले उपस्थित होते.
अल्पसंख्याकांची धर्मांधताही आत्मघातकी आहे. तर बहुजनांची धर्मांधता राष्ट्रघातकी आहे. असे सांगत पैगंबर शेख म्हणाले की, मुलभूत प्रश्नावर बोलायला लागलो की, धर्म पुढे केला जातो. मुस्लिम समाजात देखील सुधारणावादी आहेत. परंतु त्याची चर्चा होत नाही. शिक्षणासाठी आर्थिक कुर्बानी, बुरखा मुक्ती चळवळ, संविधान घराघरात, मनामनात हे विषय घेवून पैगंबर शेख लढतोय. आपले डोके मौलानांकडे गहाण ठेवू नका. हे आम्ही सांगतो. माझ्या विरोधात देखील मौलावींनी फतवा काढला होता. माझे लग्न मोडण्याचा प्रयत्न केला होता. पण आम्ही विचारापासून हटलो नाही. माझ्या पत्नीला मी प्रथम बुरखा मुक्त केले.
सम्राट अकबराच्या नाण्यांवर राम आणि सीतेचे चित्र आहे. हे देखील सांगितले पाहिजे.


