पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील JNNURM योजनेअंतर्गत चिखली परिसरात उभारलेल्या 6 हजार 720 सदनिकांना आकारला जाणारा मालमत्ता कर त्वरित रद्द करावा, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी मंगळवारी (दि.९) रोजी विधानसभेत औचित्याच्या मुद्द्यावरून केली. यासंदर्भात चिखली घरकुल फेडरेशनने नागपूर येथे भेट घेत आमदार महेश लांडगे यांचे आभार मानले.
यावेळी घरकुल फेडरेशन चे अध्यक्ष अशोकजी मगर,माजी अध्यक्ष सुधाकर धुरी, घरकुल प्रतिनिधी युवराज निलवर्ण,नागेश गवळी, माजी नगरसेवक कुंदन गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे, युवानेते संदिप शेलार,अरुण पाडुळे,मनोज कुहिते,मारुती जाधव,विजु ठोंबरे इ.उपस्थित होते
आमदार महेश दादा लांडगे यांनी या विषयाचे गांभीर्य आणि सामाजिक भान लक्षात घेतले. शहरातील हजारो कुटुंबांना प्रभावित करणाऱ्या या महत्त्वपूर्ण प्रश्नावर त्यांनी कोणताही विलंब न लावता तातडीने कार्यवाही केली. दादांच्या माध्यमातून हा विषय थेट राज्याच्या विधिमंडळाच्या पटलावर ‘लक्षवेधी’ म्हणून मांडला गेल्यामुळे शासनाला यावर त्वरित आणि सहानुभूतीपूर्वक निर्णय घेणे बंधनकारक ठरणार आहे. अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
JNNURM योजनेतून निर्माण झालेल्या या घरकुलांचे क्षेत्रफळ केवळ 36.77 चौ. मीटर (395.65 चौ. फूट) असून, अत्यंत दुर्बल घटकांतील कुटुंबे येथे वास्तव्यास आहेत. रोजंदारी, हमाली, मजुरीवर उदरनिर्वाह करणाऱ्या या लाभार्थ्यांकडून महानगरपालिका प्रॉपर्टी टॅक्स वसूल करत असल्याने त्यांच्यावर अनावश्यक आर्थिक ताण निर्माण झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने आमदार लांडगे यांनी सभागृहात स्पष्ट केले की, मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888, कलम 140(1) नुसार 46.45 चौ. मीटर (500 चौ. फूट) पर्यंतच्या निवासी घरांवर मालमत्ता कर आकारण्याची सक्ती नाही. “मुंबईत लागू असलेली ही सूट इतर महानगरपालिकांनाही समान पद्धतीने लागू व्हावी,” अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली.
नगरसेवक कुंदन गायकवाड यांनी आमदार महेश दादा लांडगे यांच्याकडे या संदर्भात पत्रव्यवहार आणि पाठपुरावा केला होता. चिखली घरकुल, अजंठा नगर, शरद नगर, ओटास्कीम या परिसरातील आर्थिक दुर्बल घटक आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील सदनिका धारकांच्या आर्थिक समस्या मांडल्या होत्या. येथील रहिवाशांची परिस्थिती पाहता कराचा व इतर शुल्काचा बोजा त्यांना सहन करणे शक्य नाही, ही संवेदनशील बाब गायकवाड यांनी आमदार महेश लांडगे यांना निदर्शनास आणून दिली होती.
कुंदन गायकवाड (नगरसेवक, पिंपरी-चिंचवड मनपा)
“आमदार महेशदादा लांडगे यांनी या विषयाची दखल घेत गांभर्याने सभागृहात हा विषय मांडला. मी फ प्रभागाचा अध्यक्ष असताना चिखली घरकुल फेडरेशनने ही मागणी केली होती. त्या मागणीची दखल घेतली गेल्याने आज त्या प्रयत्नाला यश आलं याबद्दल
आमदार महेश दादा लांडगे यांचे मनःपूर्वक आभार मानतो.”
निलेश नेवाळे (सामाजिक कार्यकर्ते)
चिखली परिसरातील घरकुल आणि आर्थिक दुर्बल घटकातील सदनिकाधारकांचा प्रश्न आमदार महेश दादा लांडगे यांनी सभागृहात उपस्थित केला. यावर आता लवकरच अपेक्षित असणारा निर्णय होईल याची खात्री वाटते. यातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल सदनिकाधारकांना न्याय मिळेल.”



